समीर वानखेडेंनी एनसीबीला अंधारात ठेवले; शाहरुखसोबत चॅटिंगची माहितीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 06:20 AM2023-05-22T06:20:24+5:302023-05-22T06:22:04+5:30
वानखेडे सकाळी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाले. कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपप्रकरणी गोसावीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सीबीआयने रविवारी पुन्हा पाच तास चौकशी केली. खासगी पंच किरण गोसावी याच्यावर गुन्हे दाखल आहेत हे माहिती नव्हते का? माहिती होती तर त्याला पंच म्हणून कसे नियुक्त केले, अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केल्याचे समजते.
वानखेडे सकाळी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाले. कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपप्रकरणी गोसावीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते. शाहरुख खान यांच्याकडून खंडणी मागणे हा आरोप, त्यांची मालमत्ता, परदेशी प्रवास, उत्पन्न व खर्च यात असलेली विसंगती अशा अनेक प्रश्नांबाबत त्यांना विचारणा केली.
आज होणार सुनावणी
वानखेडे यांना सोमवार, २२ मेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने अटक न करण्यासाठी संरक्षण दिले आहे. त्यामुळे सोमवारी न्यायालयात देखील या प्रकरणावर पुढे सुनावणी होणे अपेक्षित आहे.
शाहरुखसोबतचे चॅट माहिती नव्हते : एनसीबी
वानखेडेंनी आर्यनच्या अटकेदरम्यान ते व शाहरुख खान यांच्यातील चॅट्स कोर्टात सादर केले. मात्र, दोघांमध्ये चॅटिंग झाल्याची आम्हाला कल्पना नसल्याचा दावा एनसीबीच्या सूत्रांनी केला.
वानखेडे यांनी कोर्टात हे चॅट सादर केले, तेव्हाच हे आम्हाला समजले. या चॅटची कोणतीही कल्पना वानखेडे यांनी आपल्या तत्कालीन वरिष्ठांना दिली नसल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.