समीर वानखेडे यांना ७ सप्टेंबरपर्यंत मिळणार अंतरिम संरक्षण, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:19 AM2023-08-22T06:19:51+5:302023-08-22T06:20:20+5:30
न्यायालय वानखेडे यांच्या याचिकेवर ५ सप्टेंबरला सुनावणी घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: क्रुझ ड्रग्ज प्रकरणार बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला गोवण्यात येऊ नये, यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेल्या अंतरिम संरक्षणात न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
वानखेडे व अन्य आरोपींनी आर्यन खानच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. नितीन सांब्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. वानखेडे यांच्या याचिकेवर ५ सप्टेंबरला सुनावणी घेऊ व केंद्र सरकार ७ सप्टेंबरला त्यांची बाजू मांडेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्या सुनावणीत, वानखेडेंनी सीबीआयला तपासाविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास प्रतिबंध करावा, अशी विनंती केली होती.