समीर वानखेडे यांचं संपूर्ण सहकार्य; मुंबई पोलिसांना सादर केले आवश्यक कागदपत्रं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 09:38 PM2021-11-12T21:38:13+5:302021-11-12T21:38:50+5:30
Sameer Wankhede's cooperating Mumbai Police : तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून मुंबई पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती मिळत आहे.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबईपोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून मुंबई पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती मिळत आहे.
मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल ‘बोगस’ या शब्दाचा वापर केला होता. वर्षभरात त्यांची नोकरी जाणार, त्यांना तुरुंगात टाकणार, अशी वादग्रस्त विधाने त्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याविरोधात केली होती. वानखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आरोपांबाबत आपण तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. वानखेडे यांनी दिल्लीला जाऊन पहिल्या विवाहासंदर्भातील घटस्फोटाची कागदपत्रे व अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.
आयोगाने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला २९ ऑक्टोबरला नोटीस दिली आहे. याचा सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण गोरेगाव विभागाच्या हद्दीतील आहे. परंतु, गोरेगाव विभागाच्या कारभाराची अतिरिक्त जबाबदारी बोरीवली विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे (एसीपी) असल्यामुळे, बोरीवली विभागाच्या एसीपी रेखा भवरे यांच्यामार्फत ही चौकशी सुरू आहे.