देगलूरच्या तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:50 PM2019-11-20T18:50:25+5:302019-11-20T18:55:03+5:30

दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटल्या

Sand Mafia attacks Tehsildar of Deogalur | देगलूरच्या तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला

देगलूरच्या तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष म्हणजे  मागील चार महिन्यांपासून वाळू घाट बंद आहेत.

देगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर वाळू माफियांनी दगडाचा वर्षाव केला. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास नांदेड-हैदराबाद मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर घडली. 

देगलूर तालुक्यातील वाळू घाटावरून महसुल प्रशासनातील काही शुक्राचार्यांना हाताशी धरून अनेक वाळूमाफिया वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळूचा उपसा करुन मोठी कमाई करून घेत आहेत. विशेष म्हणजे  मागील चार महिन्यांपासून वाळू घाट बंद आहेत. मागील एक महिन्यापासून वाळू माफियात अवैधरीत्या वाळूचा उपसा करण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. मंगळवारी रात्री वाळू घाटावरून उपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार अरविंद बोळंगे, मंडळ अधिकारी गणेश कोनुले, तलाठी लक्ष्मण बेंजलवार यांनी नरगंल रोडवरील हवरगा पानंद रस्त्यावरून वाळुची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (एम. एच.२६ ए.डी.६७८२) पाठलाग केला.

शहरातील मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर वाळुचे वाहतुक करणारे वाहन येताच तहसीलदार अरविंद बोळंगे वाहन थांबवून त्याच वाहनात चालकाच्या बाजूस बसले तर चालक पळून जावू नये म्हणून मंडळ अधिकारी गणेश कोनुले हे वाहनाच्या बाजूने रस्त्यावरच उभे राहिले. तेवढ्यात शेख अहेमद व सिध्दी बाबा सिध्दी खाजा यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तहसीलदार बसलेल्या वाळुच्या वाहनावरच दगडाचा वर्षाव केला. पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी  घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दगडफेकीत वाळूची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनाचा काचा फुटल्या. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या तक्रारीवरून शेख अहेमद व सिध्दी बाबा सिध्दी खाजा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. 

वाळू माफिया निर्ढावले
वाळू माफियांना राज्याश्रय व महसूल प्रशासनातील काही शुक्राचार्याची साथ मिळत असल्याने वाळू माफिया निर्ढावले आहेत. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी तहसील कार्यालयासमोरच मंडळ अधिकारी सखाराम ठाकरे यांनी वाळुचा ट्रक पकडला असताना त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला होता. तसेच काही महिन्यापुर्वी अवैधरीत्या वाळुची वाहतूक करणारे टॅक्टर एका पोलिसांनी पकडले असताना एका निवृत्त पोलीस उपअधीक्षकाने त्या पोलिसास मारहाण करण्याची घटना घडली होती. आता तहसिलदारावरच दगडफेक केल्याने देगलूर तालुका पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Sand Mafia attacks Tehsildar of Deogalur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.