नागपुरात रेती तस्करी करणाऱ्या टिप्परने घेतले दोघांचे बळी : बोलेरोला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:12 PM2020-01-14T23:12:15+5:302020-01-14T23:14:07+5:30
रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परचालकाने प्रवाशाने भरलेल्या बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे बोलेरोतील दोघे जण ठार झाले तर १० जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परचालकाने प्रवाशाने भरलेल्या बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे बोलेरोतील दोघे जण ठार झाले तर १० जखमी झाले. राहुल बन्सी बंजारा (वय २५, रा. ग्राम ढाबा गरोट मंदसोर) तसेच भैरूलाल कारूलाल गौड (वय २५, रा. ग्राम परपडा, गरोट मंदसौर)अशी मृतांची नावे आहेत. तर, जखमी झालेल्या १० मजुरांपैकी जगदीश दुर्गा बंजारा याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी भल्या सकाळी ७ च्या सुमारास वर्दळीच्या म्हाळगीनगर चौकात हा भीषण अपघात घडला.
रोजगाराच्या शोधात तीन महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातून नागपुरात आलेली मंडळी खापरी परसोडी परिसरात झोपड्या टाकून राहतात. भल्या सकाळी उठून ते विविध भागात रात्रीपर्यंत छोटी छोटी खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू विकण्यासाठी निघतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी भल्या सकाळी १२ ते १५ जण बोलेरो पिकअप व्हॅनमध्ये (एमपी १४/ जीबी १३३२) खेळणी विकायला निघाले. त्यातील काही जण ताजबाग तर काही जण कामठीकडे जाणार होते. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळगीनगर चौक ते दिघोरी नाका मार्गाने बोलेरो जात होती. तुकाराम महाराज चौक माटे वाईन शॉपकडून रेती (माती) ची तस्करी करणाऱ्या टिप्पर (एमएच ३६/ एए १५९५) च्या चालकाने निष्काळजीपणे वेगात ट्रक चालवून बोलेरोला जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जोरदार होती की बोलेरो फुटबॉलसारखी उडून बाजूला फेकली गेली. बोलेरोत बसलेले राहुल बंजारा आणि भैरूलाल गौड हे दोघे जागीच गतप्राण झाले तर बोलेरोचालक फकीर मोहम्मद बाबुखान, गोपाल चेतन सिंग (वय २५, रा. मनसोर), बबलू बंजारा, विनोद मानगू बंजारा (वय २५, रा. सीतामावू मनसोर), जगदीश बन्सी चावडा (वय २५), अनिल जगदीश गौड (वय २२, रा. बोरखेडा नगदा उज्जैन), तेजराम सब्बा बंजारा (वय ६५, रा. अमरापूर भानपूरा, मनसोर), जगदीश तेजराम बंजारा (वय २१), नरसिंह कनिराम गराशा (वय ३५, रा. पिंपलाखेडा, मंदसौर) तसेच जगदीश दुर्गा बंजारा (वय २४, रा. खरडावडा मंदसोर, म.प्र.) हे जबर जखमी झाले.