कुलगुरू निवासस्थानात सुरक्षा रक्षकांना धमकावून चंदन चोरी
By योगेश पायघन | Published: July 15, 2022 02:07 PM2022-07-15T14:07:41+5:302022-07-15T14:08:39+5:30
Robbery of sandal wood : चार चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना धमकावून अवघ्या दहा मिनिटात मोहीम फत्ते करून पोबारा केला.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवासस्थानातून चंदनाचे झाड चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास कापून नेले. चार चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना धमकावून अवघ्या दहा मिनिटात मोहीम फत्ते करून पोबारा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार चोरट्यानी तिन्ही सुरक्षा रक्षकांना कटरचा धाक दाखवून कुलगुरू निवासाच्या प्रवेशद्वार जवळ असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनच्या शेजारील चंदनाचे झाड अवघ्या दहा मिनिटात चोरून पोबारा केला. खोडाच्या वरचा भाग सुरक्षा भिंतीच्या बाहेरून पडला आहे. सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना माहिती देताच अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी आले मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान पोलीस सहाय्यक आयुक्त अशोक थोरात, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास घटनास्थळी पाहणी केली.
चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांच्या गळ्याला चाकू लावून चंदनाचे झाड चोरून नेल्याने विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी सुरक्षा एजन्सीला पोलिसात तक्रार देण्याचे आदेश कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिले आहेत.कुलगुरू निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण रात्री साडे बारा वाजता गेले होते. त्यानंतर अडीच तासात ही घटना घडली आहे.