संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 07:52 PM2019-11-05T19:52:59+5:302019-11-05T19:55:06+5:30
प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
मुंबई - पालिकेच्या अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. काल जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान कोर्टाने संदीप देशपांडे, संतोष धुरी,शशांक नागवेकर आणि संतोष साळी यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
शुक्रवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३, १४१, १४२, १४३, ५०४, ५०६ नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला होता असून १४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी. एस. काळे यांनी दिले होते. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.