सांगलीच्या महिलेचा खून, सलगरेत पुरले, नात्यातील तरूण ताब्यात
By शीतल पाटील | Published: May 16, 2023 10:24 PM2023-05-16T22:24:20+5:302023-05-16T22:24:37+5:30
खूनाचे कारण अस्पष्ट
शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: माधवनगर बस थांब्याजवळून बेपत्ता झालेल्या महिलेचा सलगरे (ता. मिरज) येथील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यानजीक खून करून जमिनीत पुरल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. गौरी जिनपाल गोसावी (३५, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या नात्यातील निहाल गोसावी या तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले. खूनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहिल्यानगरमधील प्रकाशनगर येथे गौरी गोसावी कुटुंबासह राहण्यास आहे. त्यांच्या कुटुंबाचा भंगारचा व्यवसाय आहे. मृत गौरी गोसावी सोमवारी सकाळी माधवनगर बस थांब्याजवळ असल्याचे नातेवाईकांनी पाहिले होते. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. नातेवाईकांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठत त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.
दरम्यान, सलगरे हद्दीतील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यानजीक गायरान जागेत खून झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार संजयनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय मोरे, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जमिनीत महिलेचा मृतदेह पुरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. महिलेवर धारदार हत्याराने वार करण्यात ाआले आहेत. हा खून त्यांच्या नात्यातील निहाल गोसावी याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रात्री उशीरा ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. कवठेमहांकाळ आणि संजयनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी तपास कामात व्यस्त होती. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत खूनाचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे सलगरे परिसरात खळबळ उडाली आहे.