संजय काकडे यांना अटक आणि जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:11 AM2021-04-22T06:11:58+5:302021-04-22T06:12:15+5:30

गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले

Sanjay Kakade arrested and released on bail | संजय काकडे यांना अटक आणि जामिनावर सुटका

संजय काकडे यांना अटक आणि जामिनावर सुटका

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तळोजा तुरुंगातून सुटलेला गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणूक काढण्याच्या कटात सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेथे काही तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली.
तळोजा कारागृहातून १५ फेब्रुवारी रोजी सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या साथीदारांनी सुमारे ३०० मोटारींच्या ताफ्यासह मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्यानंतर गुंड मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणात २३ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष शाखेच्या सोशल मीडिया सेलचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी फिर्याद दिली होती. संघटित गुन्हेगारांना पडद्याआडून 
मदत केल्याच्या संशयावरुन गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी पोलिसांनी संजय काकडे यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली.
गजानन मारणे व त्यांच्या समर्थकांची जनतेचे मनामध्ये दहशत रहावी, म्हणून कट करून यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून सुनियोजनपूर्वक तळोजा जेल ते कोथरूड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद केले होते.
काकडे व मारणे यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याअनुषंगाने काकडे यांच्याकडे सखोल तपास करायचा असून त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. पी. सावंत यांनी केली.
काकडे यांच्यावतीने अ‍ॅड. चिन्मय इनामदार आणि अ‍ॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. महापालिका निवडणुका जवळ आल्याने मागील निवडणुकीतील काकडे यांचा सहभाग पाहून केवळ राजकीय द्वेषापोटी हा खोटा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली आहे. काकडे यांचा मारणेशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रतिमा मलिन करण्यासाठी
पुणे महापालिका निवडणूक आठ - नऊ महिन्यांवर आली आहे. गेल्या निवडणुकीत मी केलेले काम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच गजानन मारणेच्या रॅलीप्रकरणी मला अटक केली. मात्र, मला न्यायदेवतेवर विश्वास होता. न्यायदेवतेने अखेर मला न्याय दिला. परंतु, हे प्रकार त्यांनी थांबवावेत अन्यथा, माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचे मटेरियल तयार आहे. ते बाहेर काढावे लागेल. 
 - संजय काकडे, माजी खासदार 

Web Title: Sanjay Kakade arrested and released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.