अखेर राज्य उत्पादन शुल्कचा लाचखोर अधीक्षक संजय पाटीलला अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

By परिमल डोहणे | Published: May 14, 2024 10:13 PM2024-05-14T22:13:09+5:302024-05-14T22:13:46+5:30

बीअर शाॅपी परवान्यासाठी लाच प्रकरण

Sanjay Patil, Bribery Superintendent of State Excise finally arrested; Two days police custody | अखेर राज्य उत्पादन शुल्कचा लाचखोर अधीक्षक संजय पाटीलला अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

अखेर राज्य उत्पादन शुल्कचा लाचखोर अधीक्षक संजय पाटीलला अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

परिमल डोहणे, चंद्रपूर: बीअर शॉपी परवान्यासाठी एक लाख रुपयाच्या लाच प्रकरणातील मुख्य आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधीक्षक संजय पाटील याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठवडाभरानंतर पाचगणी(जि.सातारा) येथून अटक करण्यात यश मिळविले आहे. मंगळवारी चंद्रपुरातील न्यायालयात हजर केले असता, न्यायधीशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाटीलचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. जामीन फेटाळल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागला हे विशेष. त्याचे साथीदार दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताड या दोघांना जामीन मंजूर केला होता.

चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ७ मे रोजी बीअर शॉपीच्या परवान्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील याने आपला साथीदार दुय्यम निरीक्षक खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताळ यांच्यामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. दोघांना घटनास्थळीच अटक झाली, तर पाटील हे कोल्हापूरला मतदानासाठी गेले होते. मात्र, कारवाईची माहिती होताच, तेव्हापासून फरार होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे शोधपथक त्याच्या मागावर होते. सुरुवातीला कोल्हापुरातील एक अज्ञातस्थळी लपून बसलेल्या पाटील यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथे मुक्काम हलविला होता. गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पथकाने पाटीलला ताब्यात घेऊन दि. १४ मे रोजी सायंकाळी न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘त्या’ परवान्यांची चौकशी होणार काय?

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात चंद्रपुरात बीअर बार व बीअर शाॅपीचे परवाने मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. प्रत्येक परवान्यासाठी संबंधित परवानाधारकांना मोठी रक्कम लाच म्हणून मोजल्याची चर्चा चंद्रपुरात आहे. पाटील हे दारू विक्रेत्यांच्या गळ्यातले ताईत बनले होते. या सर्व प्रकरणाचा छडा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लावतील, अशी चर्चा आहे. उपअधीक्षक मंजुषा भोसले या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्या या प्रकरणाच्या खोलात जातील, असेही बोलले जात आहे.

Web Title: Sanjay Patil, Bribery Superintendent of State Excise finally arrested; Two days police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.