Sanjay Raut, Shraddha Murder Case: श्रद्धाचा मारेकरी आफताबला भरचौकात फासावर लटकवा, संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:47 PM2022-11-16T17:47:31+5:302022-11-16T17:48:06+5:30
आफताबने श्रद्धाचा खून करून तिचे ३५ तुकडे केले
Shraddha Murder Case: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब आमीन पुनावाला याने तिची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना उघडकीस आली. श्रद्धा वालकर ही तरूणी आफताब बरोबर दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. त्यावेळी आफताबने तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणानंतर आफताबबद्दल साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आफताबवर खटला न चालवता त्याला भरचौकात फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.
"श्रद्धा वालकर प्रकरण खूपच धक्कादायक आहे. ही एक विकृती नसून त्यापुढचं पाऊल आहे. अशा मारेकऱ्यांविरोधात कोर्टात खटले चालवण्यापेक्षा भर चौकात थेट फासावर लटकवलं पाहिजे. आपल्या मुलींनीही सावधपणे जगायला शिकलं पाहिजे. श्रद्धाच्या वडिलांचा आक्रोश आपण पाहिला. त्यांचा या सर्व प्रकरणाला विरोधा होता. तरीही तिनं ऐकलं नाही", अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आफताब दगाफटका करणार याचा श्रद्धाला आधीच आला होता संशय
श्रद्धाच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, आफताब श्रद्धाला दगाफटका करू शकतो असा श्रद्धाला आधी संशय आला होता. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने सांगितले, "श्रद्धाचा एके दिवशी मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की तिला त्या घरातून बाहेर निघायचे आहे. जर त्या रात्री ती आफताब बरोबर त्या घरात राहिली तर तो तिला मारून टाकेल. मला श्रद्धाची काळजी वाटली. मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न जुलैपासून करत होतो. तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. तिचा फोनदेखील स्विच ऑफ होता. अखेर तिच्या काही मित्रांकडे चौकशी केल्यानंतर मी तिच्या भावाला फोन केला आणि आम्ही पोलिसात गेलो." तसेच, दुसऱ्या एका मित्राने सांगितले की अफताब श्रद्धाला मारहाण करायचा, असे तिनेच त्याला सांगितले होते.