आठ रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 05:14 PM2022-10-19T17:14:54+5:302022-10-19T17:16:17+5:30
पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सतत वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या.
- मंगेश कराळे
नालासोपारा : पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने रात्रीच्या वेळी पार्किंगमधील रिक्षा चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करून ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेल्या ६ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या चोरीचा ८ रिक्षा हस्तगत केल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली आहे.
पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सतत वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. घटनास्थळावरील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सराईत आरोपी आकाश पाटील (२२) याला भोयदापाड्याच्या वाघराळ पाडा येथून १६ ऑक्टोबरला अटक केले आहे. या आरोपींकडून रिक्षा चोरीच्या ८ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी लोकमतला दिली.
यात पेल्हार ४, वालीव ३ आणि भिवंडी तालुका १ असे पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आल्याचेही सांगितले. या आरोपीने तुंगारेश्वर, शांतीनगर, भोयदापाडा, वाकणपाडा, नाईकपाडा या परिसरातून रिक्षा चोरी केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ६ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या आठ रिक्षा हस्तगत केल्या आहे.
वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींची अटक करून पोलीस कस्टडीत आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का याचा शोध घेत तपास करत आहे. चोरी केलेल्या रिक्षा ग्रामीण भागात त्याने त्याच नंबरसह विकल्या आहेत.
- विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)