सरस्वती हत्याकांडाचा क्रूरकर्मा सानेविरोधात आरोपपत्र दाखल; ६२ साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:30 AM2023-09-08T07:30:30+5:302023-09-08T07:31:09+5:30
सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मीरा रोड : मीरा रोडमधील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि सर्वांना हादरवणाऱ्या सरस्वती वैद्य (३२) हत्याकांडाचा क्रूरकर्मा आरोपी मनोज साने (५६) विरुद्ध नयानगर पोलिसांनीठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मूळचा बोरीवलीच्या बाभईचा असलेला मनोज साने हा सरस्वतीसोबत मीरा रोडच्या गीतानगरमधील गीता आकाशदीप इमारतीत भाड्याने २०१७ पासून राहत होता. विषारी कीटकनाशक देऊन ४ जून २०२३ रोजी सरस्वतीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहासोबत नग्न फोटो काढले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धा वालकर हत्याकांडामधून तसेच इंटरनेटवरून शोधले. मृतदेहाचे कटरने तुकडे करून कूकरमध्ये शिजवले व काही भाजले. थोडे तुकडे त्याने बाहेर फेकले. ६ जूनच्या रात्री पोलिसांना शेजाऱ्यांकडून समजल्यावर त्याला पकडले.
पोलिसांना घरातून सरस्वतीचे ३० ते ३५ तुकडे, कटर, कीटकनाशक बाटली, कूकर, टोप व दोघांचे मोबाइल आदी सापडले. मोबाइलमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. डिसेंबर २०२२ पासून दोघांमध्ये खटके उडत होते. १० वर्षे गोष्ट लपवून ठेवल्याचा जाब सरस्वतीने विचारला होता. मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहणे, अन्य महिलांशी चॅटिंग करणे समोर आले. साने याला दुर्धर लैंगिक आजार आहे का? व ती माहिती सरस्वतीपासून लपवून ठेवल्यावरून वाद सुरू झाल्याची शक्यता त्यावेळी पोलिस सूत्रांनी सांगितली होती.
१,२०० पानांचे आरोपपत्र
तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. साने सध्या कारागृहात आहे. सोमवार, ४ सप्टेंबर रोजी नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात सानेवर हत्येसह विविध कलमांखाली गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र असून, त्यात साने व सरस्वती लिव्ह इनमध्ये राहात होते. साने याने आधी विष देऊन हत्या केली. तिचे तुकडे करण्यासाठी वापरलेली उपकरणे आदी अनेक पुरावे पोलिसांनी नमूद केले आहेत. तिच्या बहिणी, शेजारी, डॉक्टरपासून ६२ साक्षीदार नमूद केले आहेत.