३१ लाखाच्या अपहार प्रकरणी सरपंच, ग्रामसेवकास पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:22 AM2020-08-31T00:22:20+5:302020-08-31T00:22:50+5:30
आष्टा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी सन २०१७ ते २०१९ मध्ये ३० लाख ८० हजार ८८ रूपयांचा निधी आला होता. सरपंच पंचफुला रमाकांत पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी मासिक बैठका न घेता विविध कामांवर खर्च केल्याचे दर्शवून ती रक्कम उचलली होती़
लातूर : चाकूर तालुक्यातील आष्टा येथील ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून विकास कामे न करता ३१ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यास रविवारी पोलिसांनी चाकूरच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्या. ए.एस. आलेवार यांनी दोन्ही आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आष्टा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी सन २०१७ ते २०१९ मध्ये ३० लाख ८० हजार ८८ रूपयांचा निधी आला होता. सरपंच पंचफुला रमाकांत पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी मासिक बैठका न घेता विविध कामांवर खर्च केल्याचे दर्शवून ती रक्कम उचलली होती़ त्यामुळे उपसरपंचासह सदस्यांनी तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती. चौकशी अहवालावरून विस्तार अधिकारी अनंत पुठ्ठेवाड यांनी फिर्याद दिल्याने सरपंच आणि ग्रामविकास अधिकाºयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही आरोपींना शनिवारी पोलिसांनी अटक करुन रविवारी येथील न्यायालयात उभे केले असता न्या. ए. एस. आलेवार यांनी आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.