सरपंच हत्या प्रकरण: प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले, सांगळेसह तिघांना बेड्या; आंधळे मात्र निसटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 06:26 IST2025-01-05T06:23:30+5:302025-01-05T06:26:52+5:30

: बीड पोलिसांची कारवाई, आरोपींची संख्या ८, एक फरार

Sarpanch Santosh Deshmukh murder case Main mastermind Sudarshan Ghule, Sangle and three others arrested But Andhale escapes | सरपंच हत्या प्रकरण: प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले, सांगळेसह तिघांना बेड्या; आंधळे मात्र निसटला

सरपंच हत्या प्रकरण: प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले, सांगळेसह तिघांना बेड्या; आंधळे मात्र निसटला

लोकमत न्यूज नेटवर्क

केज/पुणे : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पहाटे पुण्यातून, तर तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे यास शुक्रवारी रात्री कल्याणमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आता आरोपींची संख्या आठ झाली असून, कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी होते. त्यातील चौघे अटक होते. परंतु, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीनही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना ताब्यात घेतले. मात्र, आंधळे तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली. यापूर्वी हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड हा ३१ डिसेंबरला पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. 

सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यभरातून संताप व्यक्त होत असून २८ डिसेंबरला बीडमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी परभणीत मूक मोर्चा काढत देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

सिद्धार्थ सोनवणेनेच दिले होते लोकेशन

आधी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. नंतर अजित पवार गटाचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटेचा समावेश झाला. आता घुले याला सरपंच देशमुख यांचे लोकेशन दिल्याच्या आरोपावरून मस्साजोगचा रहिवासी सिद्धार्थ सोनवणे यालाही सीआयडीच्या पथकाने आठवा आरोपी केले व कल्याणमधून अटक केली.

डॉक्टर पती अन् वकील पत्नीला घेतले ताब्यात, आरोपी पुण्यात लपून होते हे चाैकशीत कळाले  
 

सुदर्शन घुले व इतरांना आर्थिक मदत पुरविल्याचा व आरोपीशी भ्रमणध्वनीवरून संपर्कात असल्याचा ठपका ठेवून केज येथील डॉ. संभाजी वायबसे यांना एसआयटी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नांदेडमधून ताब्यात घेतले होते. त्यांच्या वकील पत्नीलाही चौकशीसाठी आणले. 

पती-पत्नी दोघांचीही केजच्या शासकीय विश्रामगृहात दोन तास व पोलिस अधीक्षक कार्यालयात कसून चौकशी केल्यानंतर फरार आरोपींचे लोकेशन मिळाले. त्यावरून पुण्यातील बालेवाडी स्टेडियम परिसरातील एका खोलीतून घुले व सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतले. आता डॉ. संभाजी वायबसे यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. 

तिघांची दोनदा केली वैद्यकीय तपासणी
 

पुण्यातून आरोपींना शनिवारी सकाळी बीडमध्ये आणले. केजला नेण्यापूर्वी त्यांची नेकनूर स्त्री रुग्णालयात तपासणी केली. नंतर नेकनूर पोलिस ठाण्यात जबाब घेतले. तेथून केजला आणल्यावर उपजिल्हा रुग्णालयात दुपारी तपासणी केली.

चार तास चौकशी

न्यायालयातून बाहेर पडताच तीनही आरोपींना सायंकाळी नेकनूर ठाण्यात आणले. येथे एसआयटीचे प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली व सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत चौकशी केली.

सर्वांना १५ दिवसांची पोलिस कोठडी

- घुले, सांगळे आणि सोनवणे यांना शनिवारी दुपारी तीन वाजता केज येथील न्यायालयात हजर केले.
- न्या. पावसकर यांनी तिघांनाही १५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
- सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर आरोपीच्या वतीने ॲड. ए. व्ही. तिडके यांनी काम पहिले. दुपारी ४:४५ वाजता या तिघांनाही बंदोबस्तात बीडला नेण्यात आले.

अजितदादा, क्या हुवा तेरा वादा : आमदार धस

परभणी : ‘अजितदादा, क्या हुआ तेरा वादा?’ संगीत दिघोळे ते संतोष देशमुखपर्यंत परळीत किती हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, हे माहीत नसेल तर तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीहून माणसे पाठविली पाहिजे, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी शनिवारी परभणीत भव्य मोर्चा निघाला. यावेळी ते बोलत होते. धनंजय मुंडे मंत्री राहिले तर हे असेच सुरू राहील. त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकरांना मंत्री करा, कायंदेंना करा, सोळंकेंना करा, असे आधीच अजित पवारांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Sarpanch Santosh Deshmukh murder case Main mastermind Sudarshan Ghule, Sangle and three others arrested But Andhale escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.