ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवतेला अटक
By विवेक भुसे | Published: November 28, 2023 10:54 AM2023-11-28T10:54:33+5:302023-11-28T10:54:59+5:30
महेंद्र शेवते हा मध्यस्थी करत असल्याचे निष्पन झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
विवेक भुसे
पुणे : कारागृहातून ससून रुग्णालयात येणारे कैदी आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधून सेटलमेंट करणारा ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सोेमवारी रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी महेंद्र शेवते हा मध्यस्थी करत असल्याचे निष्पन झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्या अत्यंत जवळचा आणि कैद्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा म्हणून महेंद्र शेवते याला ओळखले जात होते. कैद्यांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून शेवते हा डॉक्टरांबरोबर संधान साधून कैद्यांचा ससून रुग्णालयातील मुक्काम कसा वाढविता येईल, हे पहात असे. त्यासाठी कैद्यांकडून तो लाखो रुपये वसुल करीत असल्याचे समोर आले आहे. ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी पोलीस दलातील १० अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोन पोलीस कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. असे असले तरीही ससून रुग्णालयातील कोणावरही अद्याप कारवाई केली नव्हती. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली होती. जर कारवाई केली नाही तर पोलीस आयुक्तालयासमोर बुधवारपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर आले आहेत.
महेंद्र शेवते याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी रात्री अटक केली असून त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.