सासवडचे भूमिअभिलेख कार्यालय फोडले, महत्त्वाची कागदपत्रे गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:20 AM2019-03-23T02:20:29+5:302019-03-23T02:20:49+5:30
सासवड येथील भूमिअभिलेख कार्यालयात मंगळवार, दि. १९ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाची कुलपे तोडून केली चोरी
सासवड : येथील भूमिअभिलेख कार्यालयात मंगळवार, दि. १९ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाची कुलपे तोडून कार्यालयातील कपाटे, टेबलचे ड्रॉवर यांची उचकापाचक केली असल्याचा प्रकार घडला असून, भूमिअभिलेख कार्यालयाचे परीक्षण भूमापक शाम माणिक ताथवडकर (रा. सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे शिपाई रोहित टपळे यांच्या दुसऱ्या दिवशी २० मार्चला सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परीक्षण भूमापक शाम ताथवडकर यांना फोनवर सर्व प्रकार सांगितला. ताथवडकर कार्यालयात आले असता कार्यालयाचा मुख्य दरवाजा, मुख्य गेट, कार्यालयातील सर्व दरवाजांची कुलपे, कार्यालय प्रमुखांचे कक्षाचा दरवाजा व टेबलचे ड्रॉवर तोडलेले निदर्शनास आले. विशेष म्हणजे कार्यालयातील प्रत्येक रूममधील लोखंडी कपाटे, दरवाजे तोडलेले असल्यामुळे चोरट्यांनी पैसे चोरण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. येथील भूमिअभिलेख कार्यालयात अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीमागे पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी-विक्री एजंट अथवा बनावट आणि फसवणुकीचे व्यवहार करणाऱ्या टोळीचा तर हात नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. कारण पुरंदर तालुक्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चर्चेमुळे जमिनी खरेदी-विक्रीतील फसवणुकीच्या प्रकरणांना उधाण आले आहे आणि यामध्ये पुरंदरच्या महसुली अधिकारी आणि कर्मचारी यांचे या एजंटांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
सासवड येथील भूमिअभिलेखच्या कार्यालय फोडण्याचा परवा रात्री घडलेल्या प्रकारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु प्रथमदर्शनी हा पैशाच्या हेतूने चोरीचा प्रकार नसून यामागे कार्यालयातील कागदपत्रे अथवा अन्य दस्तावेज चोरण्याच्या हेतूने अज्ञातांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे.
- अण्णासाहेब घोलप
पोलीस निरीक्षक सासवड
सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकही नाही...
सासवड येथील भूमिअभिलेख कार्यालयात संपूर्ण पुरंदर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची जुनी आणि नवीन महसुली कागदपत्रे, दस्तावेज असतात. या कागदपत्रांची सुरक्षितता अत्यंत आवश्यक असताना भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यास केलेल्या दिरंगाईमुळे आता कार्यालयाच्या तोडफोडीतील आरोपींची ओळख पटणे कठीण झाले आहे. तसेच भूमिअभिलेखच्या कार्यालयात कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त का केला जात नाही, की अधिकाºयांना कागदपत्रांचे काही महत्त्वच राहिलेले नाही?