Satara Crime | कृषी पर्यवेक्षकास १० हजारांची लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 09:30 PM2022-12-27T21:30:50+5:302022-12-27T21:32:03+5:30
फलटण मधील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकार
नसीर शिकलगार, फलटण: शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षकास लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील ४६ वर्षीय तक्रारदार व्यक्तीने त्यांच्या मयत पत्नीचे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण मंजुरीसाठी तालुका कृषी विभागाकडे दिले होते. हे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटणमधील कृषी पर्यवेक्षक बाळू निवृत्ती गावडे (वय ५२) राहणार प्लॉट नंबर ३ अष्टविनायक रो हाऊस सोसायटी प्रगती नगर बारामती (तालुका बारामती जिल्हा पुणे) याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ती लाच रक्कम स्वीकारताना बाळू गावडे याला लाच लुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.
ही कारवाई पुणे लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव ,पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक विनोद राजे पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी केली.