लंडनमधील बँकेतील दीड कोटींची रक्कम पुन्हा वाईच्या कंपनीला मिळाली; जिल्हा पोलिसांचे यश

By दत्ता यादव | Updated: February 18, 2025 23:29 IST2025-02-18T23:28:54+5:302025-02-18T23:29:36+5:30

सायबर चोरट्यांनी केले होते कंपनीचे अकाऊंट हॅक

Satara Crime company located in Wai gets Rs 1 crore 50 Lakh Rupees back from London bank | लंडनमधील बँकेतील दीड कोटींची रक्कम पुन्हा वाईच्या कंपनीला मिळाली; जिल्हा पोलिसांचे यश

लंडनमधील बँकेतील दीड कोटींची रक्कम पुन्हा वाईच्या कंपनीला मिळाली; जिल्हा पोलिसांचे यश

लोकमत न्यूज नेटवर्क, वाई: कंपनीचा मेलआयडी व अकाऊंट हॅक करून लंडनच्या बॅंकेत ट्रान्सफर झालेली दीड कोटींची रक्कम वाईच्या कंपनीला परत मिळवून देण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सुरक्षितपणे पोलिसांनी परत मिळविल्याने जिल्हा पोलिस दलाचे हे मोठे यश मानले जात आहे.

वाईतील कंपनीने फ्रान्स येथील कंपनीला मशीन तयार करून देण्यास सांगितले होते. त्या कंपनीला काही आनामत रक्कम देण्यात आली होती. जानेवारी महिन्यात या कंपनीला १ कोटी ७० लाख युरो म्हणजे भारतीय बाजार मूल्य किंमत १ कोटी ५३ लाख ५२ हजार ७० रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावर पाठविले. मात्र, फ्रान्स येथील कंपनीशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यावर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे त्यांनी वाईतील कंपनीला सांगितले.

त्यावेळी आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांनी कंपनीचा मेलआयडी आणि बँक खाते हॅककरून दीड कोटीची रक्कम परस्पर लंडनमधील बॅंकेत ट्रान्सफर करून घेतली. कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद सहस्त्रबुद्धे यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्यात आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगार सहभागी असल्याने तसेच अपहार झालेली रक्कम मोठी असल्याने वाई पोलिस आणि सायबर पोलिसांनी वेगवगळ्या तज्ज्ञांची पथके नेमली. या पथकाने लंडनमधील बॅंकेशी संपर्क साधून ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड (थांबविण्यास) सांगितले. लंडनच्या बॅंकेनेही उत्तम प्रतिसाद देऊन ही रक्कम होल्ड केली. त्यानंतर ही रक्कम लंडनच्या बॅंकेने सुरक्षितपणे वाईच्या कंपनीत पुन्हा ट्रान्सफर केली. जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, वाईचे परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर व सायबर टीमने ही रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Satara Crime company located in Wai gets Rs 1 crore 50 Lakh Rupees back from London bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.