सावधान, एकट्या महिलांच्या स्पर्शासाठी ‘तो’ आसूसलाय!, साताऱ्यात धक्कादायक प्रकार
By दत्ता यादव | Published: March 16, 2023 11:48 PM2023-03-16T23:48:51+5:302023-03-16T23:49:14+5:30
‘त्याचे’ विकृत हात शोधतायत निर्जनस्थळ
दत्ता यादव/ सातारा, लोकमत न्यूज नेटवर्क: शांत व शिस्तप्रीय साताऱ्यात आता भलतंच घडू लागलंय. शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या मनात आता असुरक्षित भावाना निर्माण होऊ लागलीय. त्याचं कारण म्हणजे ‘तो’ महिलांच्या स्पर्शासाठी आसूसलाय. त्याचे विकृत हात निर्जन ठिकाण पाहून महिलांना लक्ष्य बनवतोय. हा धक्कादायक प्रकार दोन महिलांच्या बाबतीत नुकताच घडला असून, त्या अनोळखीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय.
सातारा शहर तसं पाहिलं तर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं. रात्री अपरात्री निर्धास्तपणे महिला घराबाहेर पडू शकतात. इतकी सुरक्षितता साताऱ्यातील महिलांच्या मनात फार पूर्वीपासूनच आहे. परंतु अलीकडे शहरामध्ये सातत्याने कुठे ना कुठे तरी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. यातील दोन घटनांनी मात्र शहरातील महिलांच्या मनात भीतीदायक वातावरण तयार झालंय. एक तीस वर्षीय नोकरदार महिला रात्री आठ वाजता एकटीच दुचाकीवरून पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधून निघाली होती. यावेळी एका दुचाकीस्वाराने ग्रेडसेपरेटरमध्ये असलेली शांतता आणि कमी वर्दळ पाहून त्या महिलेचा पाठलाग केला. ग्रेड सेपरेटरमध्ये पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या कमरेला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेने संबंधित महिला भयभीत झाली. हा घृणास्पद प्रकार केल्यानंतर संबंधित दुचाकीस्वार तेथून पसार झाला. काही क्षणातच ही घटना घडली. अशा परिस्थितीतही संबंधित महिलेने त्या विकृत व्यक्तीच्या गाडीचा नंबर पाहिला. ग्रेड सेपरेटरमधून बाहेर आल्यानंतर त्या महिलेने आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग घरातल्यांना सांगितला. यानंतर हासारा प्रकार साहजिकच पोलिसांपर्यंत पोहोचला. परंतु आता प्रश्न उरतोय तो, त्या विकृत व्यक्तीच्या मनोवृत्तीचा. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातील बोगद्यात सुद्धा घडला होता. या प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याने त्या विकृताचे हे भलतेच चाळे पोलिसांनी ठेचून काढणे गरजेचे आहे. तरच महिलांच्या मनात घरकरून बसलेली भीती निघून जाईल. शिवाय अशा प्रकारचे कृत्य पुन्हा कोणी करण्याचे धाडस करायचे नाही, अशा प्रकारची अद्दल त्या विकृत व्यक्तीला घडविण्याची गरज आहे.
नोकरदार अन् महाविद्यालयीन तरुणींचे सर्वाधिक विनयभंग
सातारा शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांत १८ विनयभंगच्या घटना घडल्या असून, यामध्ये नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन तरुणींचा सर्वाधिक समावेश आहे. विनयभंग करणारे हे नोकरदार महिलेचे सहकारी तर महाविद्यालयीन तरूणींचे वर्गमित्र, नातेवाईक, शेजारी असल्याचे समोर आले आहे. रस्त्यामध्ये विनयभंगाच्या घटना फार कमी घडत आहेत. अशा प्रकारच्या सर्वाधिक घटना या कार्यालय आणि घरात होत आहेत.
सीसीटीव्ही कूचकामी..
शहरामध्ये ३४ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, हे सीसीटीव्ही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आरोपींचे चेहरे आणि त्यांच्या गाडीचा नंबर स्पष्टपणे दिसून येत नाही. यामुळे पोलिसांना तपासामध्ये प्रचंड अडथळे येत आहेत.