"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:01 PM2024-09-28T18:01:27+5:302024-09-28T18:02:51+5:30
बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता आरोपी मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजन याने दैनिक भास्करशी संवाद साधला असून त्यात त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. सत्यरंजनने महालक्ष्मीवर आपला भाऊ मुक्ती रंजनचा छळ केल्याचा आरोपही केला आहे.
सत्यरंजन म्हणाला, "एक दिवस माझा भाऊ मुक्ती रंजनने मला फोन केला, संभाषणादरम्यान तो खूपच अस्वस्थ वाटत होता. खूप विचारणा केल्यावर त्याने सांगितलं की, महालक्ष्मी त्याला ब्लॅकमेल करत होती. महालक्ष्मीने त्याच्याकडून सात लाख रुपये आणि सोन्याची चेन घेतली. हा प्रकार घरच्यांना कळताच ते प्रचंड संतापले. कुटुंबीयांनी मुक्ती रंजनला विचारलं की, जर तू त्या मुलीला (महालक्ष्मी) सर्व दिलंस तर आम्ही काय करणार आणि कुठे जाणार?"
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजनच्या बोलण्यावरून असं सूचित होतं की, तो महालक्ष्मीच्या हत्येच्या एक दिवस आधी घरी आला होता. मुक्ती रंजनच्या आईनेही तो घरी आल्याचं सांगितलं आहे. मुक्ती रंजनची आई म्हणाली, "तीन मुलांमध्ये मुक्ती रंजन सर्वात लहान होता आणि तो दोन वर्षांनी घरी आला. रात्री दहा वाजता घरी आलेला मुक्ती रंजन खूप अस्वस्थ होता. घरी आल्यावर त्याने चहा करायला सांगितला आणि नंतर जेवला. पहाटे चारपर्यंत घरात राहिल्यानंतर तो लॅपटॉप, अंगठी, चेन घेऊन घराबाहेर पडला."
मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजनने सांगितलं की, "हत्येपूर्वी मुक्ती रंजन माझ्याकडे आला आणि म्हणाला की, तो खूप त्रस्त आहे, त्याला भीती होती की, तो मोठा गुन्हा करेल. एकदा मुक्ती रंजन केरळला जात असताना रस्त्यात बाईक थांबवून महालक्ष्मीमुळे त्याला मारहाण झाली होती. लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी एक हजार रुपये घेऊन सोडून दिलं."