घराला टाळे ठोकून सौरभ त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:32 AM2022-04-08T06:32:12+5:302022-04-08T06:32:44+5:30
Saurabh Tripathi News: अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या मेहुण्याच्या अटकेनंतर, त्रिपाठी यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या मेहुण्याच्या अटकेनंतर, त्रिपाठी यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, त्यांच्या लखनऊ येथील घराला टाळे ठोकून त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब आहे.
गुन्हे शाखेने सहायक विक्रीकर आयुक्त आशुतोष मिश्रा (३७) यांना उत्तर प्रदेशमधून बुधवारी अटक केली आहे. मिश्रा हे निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे मेहुणे असून हवालाच्या माध्यमातून पाठविलेली खंडणीची रक्कम स्वीकारल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. मिश्रा हे याप्रकरणात अटक झालेले पाचवे आरोपी आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडे हप्त्याची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्याचा गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) तपास करत आहे. सीआययूने याप्रकरणी ओम वंगाटे, नितीन कदम, समाधान जमदाडे यांच्यासह त्रिपाठींच्या लखनऊ येथील घरात काम करणाऱ्या पप्पूकुमार गौड याला अटक केली आहे.