नागपुरातील शांतीनगरात बचत गटाचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:37 PM2020-02-28T23:37:36+5:302020-02-28T23:38:23+5:30

बचत गट तसेच फंड योजनेच्या नावाखाली ठिकठिकाणच्या महिला-पुरुषांकडून लाखो रुपये गोळा करून एका महिलेने या रकमेचा अपहार केला.

Savings group scam in Shanti Nagar in Nagpur | नागपुरातील शांतीनगरात बचत गटाचा घोटाळा

नागपुरातील शांतीनगरात बचत गटाचा घोटाळा

Next
ठळक मुद्देफंड योजनेखाली रक्कम हडपली : महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बचत गट तसेच फंड योजनेच्या नावाखाली ठिकठिकाणच्या महिला-पुरुषांकडून लाखो रुपये गोळा करून एका महिलेने या रकमेचा अपहार केला. नियोजित मुदतीनंतरही आपली रक्कम परत करण्यास ती महिला टाळाटाळ करीत असल्याने अखेर जमावाने शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. योगिता गजानन कोठाळकर (वय ३७) असे आरोपी महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योगिता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर कॉलनीत राहते. जून-जुलै २०१८ मध्ये तिने हरसिद्धी फंड योजना सुरू केली. त्यात विविध लोकांकडून महिन्याला रक्कम जमा केली जात होती. विशिष्ट मुदतीनंतर दामदुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष तिने दाखवले होते. गुंतवणूकदाराला मध्ये अडचण आल्यास कर्जाच्या रूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचीही थाप ती मारत होती. त्यात अनेकांनी रक्कम जमा करणे सुरू केल्याने योगिताने नंतर माता बचत गट स्थापन करून ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. सुधीर बळवंत कामडे (वय ४१, रा. प्रेमनगर) यांनी तसेच परिसरातील अनेकांनी तिच्याकडे फंड जमा केला. प्रारंभी रक्कम जमा करण्याची तसेच परतफेडीची मुदत ६ जुलै २०१८ ते ५ सप्टेंबर २०१९ अशी होती. कामडे आणि अन्य १३ जणांनी मुदत संपल्यानंतर आपली रक्कम परत मागणे सुरू केले. सुरुवातीला वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळणाऱ्या योगिताने नंतर वेगवेगळी थाप मारणे सुरू केले. ती रक्कम परत करीत नसल्याने काही जणांनी तिच्यावर दबाव वाढवला. त्यामुळे योगिताने रक्कम देण्यास चक्क नकार दिला. तिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे नागरिकांनी शांतीनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बरेच दिवस तपास केल्यानंतर अखेर गुरुवारी या प्रकरणी योगिता कोठाळकरविरुद्ध कलम ४०६, ४१८, ४२० तसेच सहकलम ८, ३ एमपीआयडी अन्वये गुन्हा दाखल केला.

पीडितांमध्ये खळबळ
योगिता कोठाळकरकडे रक्कम जमा करणारी मंडळी गोरगरीब आहे. मुलांचे शिक्षण, लग्न तसेच आवश्यक कामांना नजरेपुढे ठेवून अनेकांनी पोटाला पीळ देत योगिताकडे रक्कम जमा केली. अनेकांनी रोजमजुरी करून आपली रक्कम तिच्या हवाली केली. तिने ही रक्कम गिळंकृत केल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: Savings group scam in Shanti Nagar in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.