३१ आडत्यांना दोन कोटींचा गंडा घालणारी सविता पोलिसांच्या हाती लागेना

By सुनील काकडे | Published: September 26, 2022 03:07 PM2022-09-26T15:07:24+5:302022-09-26T15:08:31+5:30

वाशिमातील प्रकरण : फसवणूक झालेले ३१ आडते न्यायाच्या प्रतिक्षेत

Savita, who cheated the victims of two crores, was not caught by the police of washim | ३१ आडत्यांना दोन कोटींचा गंडा घालणारी सविता पोलिसांच्या हाती लागेना

३१ आडत्यांना दोन कोटींचा गंडा घालणारी सविता पोलिसांच्या हाती लागेना

googlenewsNext

वाशिम - जिल्हा आडते व खरेदीदार व्यापारी असोसिएशनअंतर्गत नोंदणीकृत ३१ आडत्यांची ऑक्टोबर २०२१ मध्ये २ कोटी ११ लाख ७० हजार ६६२ रुपयांनी फसवणूक झाली. याप्रकरणी दोन आरोपी गजाआड झाले आहेत; मात्र घटनेला ११ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असताना शेतमाल खरेदी परवाना नावे असलेली मूख्य सुत्रधार सविता भगवान कराळे ही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. यामुळे उलटसूलट चर्चा होत असून आर्थिक गुन्हे शाखेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की आडत्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारी सविता कराळे ही पती भगवान कराळे आणि सासरे विठ्ठल कराळे या दोघांच्या मदतीने शेतमाल खरेदी करत होती. जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यात तिने वाशिम बाजार समितीमधील ३१ आडत्यांकडून २ कोटी ११ लाख ७० हजार ६६२ रुपये किंमतीचा ४४०० क्विंटल चना आणि तूर हा शेतमाल खरेदी केला. मात्र, पैसे देण्यास सातत्याने टाळाटाळ केली.

अखेर संयम सुटल्याने सुरेश भगवान भोयर (आडते) यांनी वाशिम शहर पोलिसांत २६ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली. त्यावरून सविता कराळेसह भगवान विठ्ठल कराळे आणि विठ्ठल लक्ष्मण कराळे यांच्यावर भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याच रात्री विठ्ठल कराळेला अटक केली; तर काही दिवसांनंतर भगवान विठ्ठल कराळे यालाही अटक करण्यात आली; मात्र सविता भगवान कराळे ही मूख्य सुत्रधार ११ महिन्यानंतरही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

फसलेल्या आडत्यांची ‘एसपीं’कडे धाव

आमचे २ कोटी ११ लाख ७० हजार रुपये घेऊन पळालेली सविता कराळे ही अद्याप फरारच आहे. तिला लवकरात लवकर अटक करून ३१ आडत्यांचे पैसे तिच्याकडून वसूल करून द्यावे, अशी मागणी फसवणूक झालेल्या आडत्यांनी आज, २६ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

Web Title: Savita, who cheated the victims of two crores, was not caught by the police of washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.