हजारो कोटींचा घोटाळा; कंपनीचा सीए बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 03:59 AM2020-10-15T03:59:01+5:302020-10-15T03:59:24+5:30
या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झाल्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली.
ठाणे : तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा असलेल्या मुंबईतील ‘कॉक्स अॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टुर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८, रा. चरई, ठाणे) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या बेपत्ता होण्यामागे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.
ठाण्यातील चरई भागात राहणारा सागर हा ११ ऑक्टोबर रोजी ‘टिटवाळ्याला जाऊन येतो’, असे सांगून घरातून बाहेर पडला. तो एमएच-०४-जीएम-३५१५ या क्रमांकाच्या मोटारकारने कंपनीच्या टिटवाळा येथील कार्यालयाकडे गेल्याचे सांगण्यात येते. ‘कॉक्स अॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या कंपनीच्या मुंबई आणि टिटवाळा येथे शाखा आहेत.
या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झाल्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली. याच प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात सागरला गेल्या आठवड्यात बोलविले होते. त्याच्याकडे आणखी चौकशी बाकी असल्यामुळे त्याला पुन्हा १३ आॅक्टोबर रोजी पाचारण करण्यात होते.