विमान कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:55 AM2020-03-14T00:55:46+5:302020-03-14T00:55:51+5:30
नोकरीच्या आनंदात तरुणाने संदेशात दिलेली लिंक उघडताच, कंपनीची सर्व माहिती देत सोबतच मुलाखतीसाठी ९ हजार ८०० रुपये हे १८ टक्के जीएसटीसह भरण्यास सांगितले होते.
मुंबई : विमान कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्याचे सांगून फसवणूक केल्याची घटना अंधेरीत घडली. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाच्या मोबाइलवर २३ जानेवारीला विमान कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्याचा संदेश धडकला.
नोकरीच्या आनंदात तरुणाने संदेशात दिलेली लिंक उघडताच, कंपनीची सर्व माहिती देत सोबतच मुलाखतीसाठी ९ हजार ८०० रुपये हे १८ टक्के जीएसटीसह भरण्यास सांगितले होते. त्यानुसार, तरुणाने ११ हजार ५६४ रुपये भरले. काही वेळातच कंपनीतून बोलत असल्याचे सांगून राकेश नेगी नावाच्या व्यक्तीने कॉल केला. नेगी याने त्याला अधिक रक्कम भरल्याचे सांगून फक्त ९ हजार ८०० रुपये भरण्यास सांगितले. याआधी भरलेली रक्कम तो परत करणार असल्याचेही आश्वासन त्याला दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने आणखी ९ हजार ८०० रुपये भरले. आधीची रक्कम परत खात्यात न आल्याने तरुणाला संशय आला. त्याने पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. मात्र, त्यानंतर संबंधित कॉलधारकाने फोन बंद केला.