धक्कादायक! कुत्रा भुंकला, 'तो' घाबरला; फूड डिलिव्हरी बॉयने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:38 AM2023-01-14T11:38:51+5:302023-01-14T11:43:09+5:30
पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याला घाबरलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याला घाबरलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मोहम्मद रिझवान (23) असं तरुणाचं नाव आहे. तो स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी बॉय आहे. बंजारा हिल्स येथील एका अपार्टमेंटमध्ये पार्सल देण्यासाठी गेला होता. युसूफगुडा परिसरातील श्रीराम नगरमध्ये राहणाऱ्या रिझवानची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिझवानचा भाऊ मोहम्मद खाजा याने गुरुवारी रात्री बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. मोहम्मद रिझवान हा शोभना या ग्राहकाला खाद्यपदार्थ पार्सल देण्यासाठी बंजारा हिल्स भागात पोहोचला. रिझवानने पोलिसांना सांगितले की, 11 वर्षीय जर्मन शेफर्ड कुत्रा दरवाजा उघडताच भुंकत त्याच्याकडे धावला. त्यानंतर, तो घाबरला आणि पळाला, पण कुत्रा त्याच्या मागे लागला. रिझवानला पुढे पळून जाण्याचा मार्ग सापडत नव्हता.
डोक्याला गंभीर दुखापत
कुत्र्याने रिझवानवर झेप घेतली. त्याला काहीच समजले नाही आणि घाबरून रिझवानने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. भीतीपोटी रिझवानने इमारतीवरून उडी मारताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सांगितले की शोभना खाली धावत आली, तिला रिझवान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला उपचारासाठी निजामच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) मध्ये नेले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तो अजूनही आयसीयूमध्ये आहे.
रिझवान गेल्या तीन वर्षांपासून डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत आहे. त्याच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोभनाविरुद्ध आयपीसी कलम 336 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणे) आणि 289 (प्राण्यांबाबत निष्काळजीपणाचे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"