पालकांनो सांभाळा! फ्री फायर गेमच्या नादी लागलेली शाळकरी मुले निघाली मुंबईकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:03 PM2021-02-13T21:03:45+5:302021-02-13T21:04:35+5:30
crime News: पालक आणि पोलिसांची तारांबळ : नाशिकला ट्रेनमधून उतरविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्री फायर गेमच्या नादी लागलेली नागपुरातील तीन शाळकरी मुले आज भल्या सकाळी घरून निघून गेली. पालक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मुले रेल्वेद्वारे मुंबईकडे जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरपीएफच्या मदतीने सायंकाळी या तिघांना नाशिक रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. पालकांच्या काळजाची धडधड वाढविणारी ही घटना शनिवारी नागपुरात घडली.
१५, १६ आणि १७ वर्षे वय असलेली ही तीनही मुले प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. ते दहावीचे विद्यार्थी आहेत. कोरोना संसर्गाच्या भितीमुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाइन क्लासच्या नावाखाली हे तिघेही आपापल्या घरी फ्री फायर ऑनलाइन गेम खेळत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विरंगुळा म्हणून पालकांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, या तिघांनाही व्यायामाची आवड असून रोज भल्या सकाळी ते फिरायला जात होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी बॅग घेऊन ते मॉर्निंगवाकला जातो म्हणून घरून निघून गेले. ९ वाजले तरी ते घरी परत आले नाही. त्यामुळे तीनही मुलांच्या आईवडिलांनी एकमेकांकडे चौकशी केली. विशेष म्हणजे, यातील एका मुलाने आपल्या आईला शुक्रवारी सायंकाळी आपण उद्या सकाळी मित्रांसोबत मुंबईला फ्री फायर गेमचे टूर्नामेंट खेळन्यासाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. आईने कुणासोबत जात आहे, अशी विचारणा केल्यानंतर सध्या क्लास आणि नंतर परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे आता जायचे नाही, परीक्षा संपल्यानंतर जा असे म्हणून त्याला गप्प केले. यावेळी त्या मुलाने ओके म्हणत आपल्या आई-वडिलांना संशय येणार नाही, याची काळजी घेतली.
तो आज सकाळी घरून जाताना बॅगमध्ये कपडे घेऊन गेल्याचे आईच्या लक्षात आल्याने तिने मुलाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर या मुलाचेआई-वडील त्याच्या मित्राच्या घरी गेले. तेव्हा तो सुद्धा घरून मॉर्निंग वॊकच्या बहाण्याने बॅग घेऊन आणि त्यात स्वतःचे कपडे भरून गेल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या मुलाच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याने ते पळून गेल्याचा निष्कर्ष पालकांनी काढला. त्यानंतर तिन्ही मुलांच्या पालकांनी लगेच प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठले. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलिस उपायुक्त नूरुल हसन यांना कळली. त्यांनी तातडीने पोलीस पथक रेल्वेस्थानकावर पाठवले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही तीनही मुले मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक पोलीस. रेल्वे पोलीस, आरपीएफच्या अधिकाऱयांनी अकोला, जळगाव नाशिक आणि मुंबई रेल्वे पोलिसांना अलर्ट दिला. या मुलाचे लोकेशन्स काढल्यानंतर हे तिघे बसून असलेली रेल्वेगाडी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान नाशिकला पोहोचणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार नाशिक स्थानकात रेल्वे गाडी थांबताच पोलिसांनी त्या तिघांना आरपीएफने ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर या तिघांना नागपूरकडे परत कसे पाठवावे, या संबंधाने विचार विमर्श सुरू होता.
असा आहे फ्री फायर गेम
२०१९ चा जगातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला फ्री फायर ऑनलाइन गेम एकाच वेळी ५० जण खेळू शकतात. विमान / हेलिकॉप्टर मधून पॅराशूटच्या माध्यमाने बेटावर उडी घ्यायची आणि तेथे दडून असलेल्या अन्य ४९ जणांना शोधून वेगवेगळ्या शस्त्राच्या आधारे ठार मारायचे, जो एक शिल्लक राहिल, तो गेमचा 'विनर', असा हा गेम आहे.
----