शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:15 PM2022-07-18T22:15:15+5:302022-07-18T22:16:18+5:30
Gangrape Case : दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीला शहादाणा चौकाजवळ सोडून चार तरुण पळून गेले.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे शाळेत जाणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी चार तरुणांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला दिवस-रात्र ओलीस ठेवले. यादरम्यान तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीला शहादाणा चौकाजवळ सोडून चार तरुण पळून गेले. कसेबसे मुलीने घरी पोहोचून घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.
यानंतर कुटुंबीयांनी विद्यार्थिनीसह बिथरीचैनपुर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. बिथरीचैनपुर पोलिसांनी विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची नोंद केली, मात्र बलात्काराचा गुन्हा नोंदवला नाही. याची माहिती मिळताच हिंदू संघटनांच्या नेत्यांनी दुपारी पोलिस ठाणे गाठून पोलिसांच्या या वृत्तीचा निषेध केला. नंतर पोलिसांनी रविवारी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक शितांशू के शर्मा यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. त्याच आधारे हा अहवाल दाखल करण्यात आला. ते म्हणाले की, पीडितेच्या जागीच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत उवैस आणि शाहरुख या दोन आरोपींना अटक केली. विद्यार्थिनी महिला पोलिस ठाण्यात असून, तिच्या जबाबानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.