शाळेचे प्रिंसिपल विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले, फूस लावून तिला पळवले, अखेर कुटुंबीयांनी पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 06:32 PM2021-11-23T18:32:23+5:302021-11-23T18:33:55+5:30
Crime News: राजस्थानमधील झुंझुनूं येथून एक अजब मामला समोर आला आहे. झुंझनू येथील एका शाळेतील प्रिंसिपल आपल्याच एका माजी विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले. या एकतर्फी प्रेमातून या प्रिंसिपल महोदयांनी त्या विद्यार्थिनीचे अपहरण केले.
जयपूर - राजस्थानमधील झुंझुनूं येथून एक अजब मामला समोर आला आहे. झुंझनू येथील एका शाळेतील प्रिंसिपल आपल्याच एका माजी विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले. या एकतर्फी प्रेमातून या प्रिंसिपल महोदयांनी त्या विद्यार्थिनीचे अपहरण केले. यामध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने त्यांची मदत केली. जेव्हा ही विद्यार्थिनी शाळेत शिकायची तेव्हा सदर प्रिंसिपल तिच्या प्रेमात पडले होते. दरम्यान या विद्यार्थिनीच्या अपहरणाची माहिती मिळताच तिचिया कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर खूप प्रयत्न करून त्यांनी तिची सुटका केली.
माध्यमातील वृत्तानुसार सदर विद्यार्थिनी शाळेतून उत्तीर्ण झाली आहे. तसेच सध्या ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान, तिच्या अपहरणाची माहिती कुटुंबीयांना मिळाली तेव्हा खळबळ उडाली. मात्र प्रसंगावधान दाखवत कुटुंबीयांनी या विद्यार्थिनीची प्रिंसिपलांच्या तावडीतून मुक्तता केली. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे सांगण्यात येत आहे.
ही घटना सोमवारी घडली असून, तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रिंसिपलसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रिंसिपलने लग्नाला जाण्याच्या बहाण्याने सदर विद्यार्थिनी आणि तिच्या आईला बोलावले होते. कार्यक्रमातून परतत असताना आरोपीने विद्यार्थिनीला कारमध्ये बसवून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
त्या गाडीमध्ये काही लोक आधीपासून बसलेले होते. विद्यार्थिनीला जबरदस्तीने पळवत असल्याचे पाहिल्यानंतर तिच्या आईने आरडा-ओरडा केला. त्यानंतर तिने फोनवरून याची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार मिळताच पोलिसांनी नाकेबंदी केली. तर कुटुंबीयांनी पाठलाग करून सदर प्रिंसिपलला पकडले आणि विद्यार्थिनीची त्याच्या तावडीतून सुटका केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.