हुंड्यात स्कॉर्पिओ अन् 25 लाखांची मागणी; नकार दिल्याने विवाहितेला HIV बाधित इंजेक्शन टोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 21:01 IST2025-02-16T21:00:36+5:302025-02-16T21:01:14+5:30
याप्रकरणी पीडितेच्या पती आणि मेहुण्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुंड्यात स्कॉर्पिओ अन् 25 लाखांची मागणी; नकार दिल्याने विवाहितेला HIV बाधित इंजेक्शन टोचले
UP Crime : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गंगोह पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने तिच्या सासरच्यांनी तिला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल नावाच्या महिलेचे 15 फेब्रुवारी 2023 रोजी हरिद्वार येथील रहिवासी अभिषेकसोबत लग्न झाले. सोनलच्या घरच्यांनी लग्नात खूप खर्च केला. सोबतच हुंड्यात भरपूर पैसे, दागिने आणि एक कारही दिली. पण सासरचे लोकांचे समाधान होत नव्हते. त्यांनी मुलीकडे आणखी 25 लाख रुपये रोख आणि स्कॉर्पिओ गाडीची मागणी केली. यासाठी त्यांनी सोनला खूप छळ केला.
अनेक दिवस छळ केल्यानंतर सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. यानंतर गावात पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीने तिला पुन्हा सासरच्या घरी पाठवले. यावेळी सासरच्यांनी सोनलला एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीची प्रकृती खालावल्यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात सोनलचा पती आणि मेहुण्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.