भिवंडीत दहावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; दोन ठिकाणी तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:31 AM2019-03-22T06:31:14+5:302019-03-22T06:31:29+5:30
भिवंडीत गेल्या दोन दिवसांपासून दहावीचे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉट््सअॅपवर फुटत होते. बुधवारी काल्हेरच्या विद्यालयातील शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थिनींच्या व्हॉट््सअॅप ग्रुपवर पेपर आढळल्याने पेपर फुटल्याची माहिती पसरली.
भिवंडी - भिवंडीत गेल्या दोन दिवसांपासून दहावीचे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉट््सअॅपवर फुटत होते. बुधवारी काल्हेरच्या विद्यालयातील शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थिनींच्या व्हॉट््सअॅप ग्रुपवर पेपर आढळल्याने पेपर फुटल्याची माहिती पसरली. ही माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव व केंद्र संचालक यांनी दोन विविध पोलीस ठाण्यांत तक्रार दिली आहे. हा पेपर ‘टॉपर ग्रुप’ नावाच्या ग्रुपवर आढळल्याने पोलीस या ग्रुपचा शोध घेत आहेत.
काल्हेर गावाच्या हद्दीतील परशुराम धोंडू टावरे विद्यालयात दहावीचा इतिहास विषयाचा पेपर सुरू होता. मात्र, विद्यालयाबाहेर रिक्षात बसलेल्या तीन विद्यार्थिनी परीक्षेची वेळ होऊनही त्या परीक्षा केंद्रात येत नसल्याने शिक्षिका विद्या पाटील यांना त्या विद्यार्थिनींवर संशय आला. त्यांनी त्या मुलींचे मोबाइल तपासले असता ‘टॉपर ग्रुप’ नावाने असलेल्या व्हॉट््सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हा पेपर व्हायरल झाला होता. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्र्थिनींचे मोबाइल तपासले असता १५ व १८ मार्चचे विज्ञानाचे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले. ही माहिती शिक्षिका पाटील यांनी केंद्र संचालकांच्या निदर्शनास आणून दिली असता केंद्र संचालक गणेश भोईर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात परीक्षेचे पेपर पुरवणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच मंडळाचे विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या दोन्ही तक्रारी बुधवारी दाखल झाल्या असून या प्रकरणी विद्यार्थिनींचे तीन मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कुणालाही अटक केलेली नाही.
व्हायरल झालेल्या पेपरमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ना, गुण कमी तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत असून पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
होली मेरी शाळेच्या विद्यार्थिनी
काल्हेरच्या शाळेत दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या त्या सहा विद्यार्थिनी राहनाळ येथील होली मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या आहेत. नारपोली व शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कारवाई करणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली.
प्रश्नपत्रिका व्हायरल होण्यास शिक्षण मंडळ जबाबदार, पालकांचा आरोप
मुंबई : प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर व्हायरल होत असल्याची तक्रार शिक्षण मंडळाकडे करूनही तत्काळ कार्यवाही न केल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप पालकांसह संवाद फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंदप्रसाद शर्मा यांनी केला आहे. वारंवार होणाºया पेपरफुटीला शिक्षण मंडळाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भिवंडी येथे राहणारे गोविंदप्रसाद शर्मा यांनी यासंबंधी १६ मार्च रोजी भिवंडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीे. विज्ञान-१ची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी एक तास आधी काही विद्यार्थ्यांना मिळाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीच दुसºया दिवशी सकाळी ११च्या आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार दुसºया दिवशी परीक्षेच्या एक तास आधी त्यांना अनधिकृत मार्गाने प्रश्नपत्रिका मिळाली. ही प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेला आलेली प्रश्नपत्रिका सारखीच असल्याचे शर्मा यांनी तक्रारीत म्हटले. हा प्रकार गणित, भूमिती विषयांच्या परीक्षांवेळीही झाला. मंडळाच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही पत्र लिहिले तरी याची दखल घेतली नाही, अशी शर्मा यांची तक्रार आहे. मंडळाने तक्रार करूनही योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळेच पुन्हा पेपर फुटल्याचा आरोप करत पालकांनी शिक्षण विभाग आणि मंडळावर नाराजी व्यक्त केली आहे.
...तर कारवाई करणार
पोलीस तक्रार दाखल झाल्याचे आम्हाला समजले आहे. त्यानुसार शिक्षण मंडळ तक्रारीची शहानिशा करेल. त्यात तथ्य आढल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी सांगितले.