सरस्वतीचे तुकडे करणाऱ्या आरोपी मनोज सानेची 'सर्च हिस्ट्री' समोर; पोलिसांचा तपासात खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 06:29 PM2023-06-12T18:29:25+5:302023-06-12T18:33:03+5:30
मृत सरस्वती वैद्य आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई - मीरारोड परिसरातील सरस्वती वैद्य हत्याकांडात रोज नवनवीन खुलासा समोर येत आहे. पोलीस या प्रकरणात आरोपी मनोज सानेची रोज चौकशी करतात. आरोपीने मृत सरस्वतीचे केस किचनमध्ये ठेवले होते. सरस्वतीच्या डोक्यावरील हे केस पाहून पोलीस ठाण्यात तिच्या बहिणींना अश्रू अनावर झाले. सरस्वतीला तिचे लांब केस खूप आवडायचे या आठवणी तिच्या बहिणींनी पोलिसांना सांगितल्या.
हत्येनंतर पहिल्यांदाच बहिणींचा झाला आरोपीशी सामना
मीरा-भाईंदर पोलीस सरस्वती वैद्य हिच्या बहिणींचा जबाब नोंदवून घेत आहेत. पोलिस तपासात सरस्वतीला ४ बहिणी होत्या हे पुढे आले. त्यातील ३ बहिणींचा जबाब पोलिसांनी नोंद केला. सरस्वतीच्या हत्येनंतर पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात आरोपी मनोज साने आणि तिच्या बहिणी समोरासमोर आल्या. त्यावेळी सरस्वतीच्या बहिणींचा संताप अनावर झाला. या दोषीला कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी मृत सरस्वतीच्या बहिणींनी केली.
मनोज साने नियमित पाहायचा अश्लिल व्हिडिओ
चौकशीवेळी पोलिसांनी मनोज सानेचा मोबाईल तपासला त्यात तो नियमित अश्लिल व्हिडिओ पाहत असल्याचे समोर आले. त्याचसोबत एका कागदावर त्याने अश्लील वेबसाईट्सची नावे लिहिली होती. हा कागद पोलिसांनी जप्त केला. लवकरच पोलीस सरस्वतीच्या बहिणी आणि आरोपी मनोज सानेची समोरासमोर बसून चौकशी करणार आहेत. पोलीस आरोपीची नेहमी चौकशी करत असून तो सातत्याने जबाबात बदल करत आहे.
मृतदेह ठिकाण्यावर लावण्याबाबत गुगलवर सर्च
सरस्वतीच्या हत्येनंतर आरोपीने तिचे फोटो घेतले. त्याचसोबत मृतदेह ठिकाण्यावर लावण्याबाबत गुगलवर सर्च केले. मृतदेहापासून येणारा दुर्गंधीपासून सुटका करण्यासाठी काय करायचे हेदेखील आरोपीने गुगलवर सर्च केले. त्यानंतर एका दुकानातून निलगिरी तेलाच्या ५ बॉटल आरोपीने घरी आणल्या.
मंदिराच्या पुजाऱ्याची लग्नाबाबत चौकशी होणार
मृत सरस्वती वैद्य आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सरस्वती वैद्य हिच्यासोबत बोरिवली येथील मंदिरात लग्न केल्याचे आरोपीने मान्य केले आहे. पोलीस मंदिराचे ठिकाण आणि त्यांचे लग्न करणाऱ्या पुजारीची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच त्यांच्या लग्नाच्या अन्य साक्षीदाराचा शोध पोलीस घेणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांचे लग्न त्यांच्या ओळखीच्या लोकांपासून लपविल्याचेही पोलिसांना समजले. मनोज साने हा गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड परिसरातील आकाशगंगा इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये वैद्य यांच्यासोबत राहत होता.