आईपासून ताटातूट झालेल्या कुत्रीच्या पिल्लांची शोधाशोध सुरु; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:04 PM2021-02-17T17:04:22+5:302021-02-17T17:05:27+5:30
Crime News : सतर्क नागरिकाच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ गुरुनानक शाळा परिसर सार्वजनिक रस्त्यावर भटकणाऱ्या एक कुत्रीसह तिच्या ६ पिल्लांची ताटातूट करणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सतर्क नागरिकाच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ गुरुनानक शाळा परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर एक कुत्री तिच्या ६ पिल्लासह राहत होती. शनिवारी सायंकाळी साडे ५ वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल ठाकरे नावाच्या इसमाने कुत्र्याचे पिल्ले पकडली. पकडलेली कुत्र्याची ६ पिल्ले कॅम्प नं-५ येथील माशे मार्केट परिसरात सोडून दिली. कुत्री आणि पिल्लांची ताटातूट झाल्याने, सतर्क नागरिक राज चोटवानी यांनी याबाबतची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१),(प) प्रमाणे गुन्हा दाखल केला. कुत्री व पिल्लांची ताटातूट करणाऱ्या ठाकरे विरोधात गुन्हा दाखल होताच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुत्रीच्या पिल्लांची शोध मोहीम सतर्क नागरिक व पोलिसांनी घेतली आहे.