झडती घेतली अन् निघाले तब्बल सात चाकू, एक तलवार
By विशाल सोनटक्के | Published: September 7, 2023 02:37 PM2023-09-07T14:37:00+5:302023-09-07T14:37:17+5:30
हत्यारांचा साठा आढळताच पथकाने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यवतमाळ : गुन्हा करण्याच्या तयारीत एकजण असल्याची खबर मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळगाव येथील एकाच्या झडती घेतली असता तब्बल सात नग मोठे स्टीलचे चाकू आणि एक लोखंडी तलवार आढळून आली. हत्यारांचा साठा आढळताच पथकाने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना पिंपळगाव येथील विकास रमेश चव्हाण याने गुन्हा करण्याच्या हेतूने घरातील लोखंडी पेटीत विनापरवाना घातक व धारदार शस्त्र बाळगली असल्याची माहिती मिळाली. या खबरीवरून पथकाने पिंपळगाव येथे जावून चव्हाण याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात सात चाकूसह एक लोखंडी तलवार आढळून आली.
पोलिसांनी कलम ४, २५ आर्म ॲक्टसह कलम १२३, १३५ मकोका अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि विवेक देशमुख, सहायक फौजदार बंडू डांगे, साजीद सय्यद, अजय डोळे, निलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे आदींच्या पथकाने पार पाडली.