दोन पत्नींकडून पतीची वाटणी; करार मोडताच पोलीस चौकी गाठली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 09:00 PM2020-01-27T21:00:45+5:302020-01-27T21:04:17+5:30
विचित्र करार मोडल्यानं दुसरी पत्नी पोलीस ठाण्यात; धरणं आंदोलन सुरू
रांची: दोन बायका आणि फजिती ऐका, असा काहीसा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. पतीवरुन दोन पत्नींची भांडणं होऊ लागल्यानं तिघांनी मिळून यावर तोडगा काढला. वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी त्यांनी एक करार केला. मात्र हा करार मोडला गेल्यानं दुसऱ्या पत्नीनं पोलीस ठाणं गाठलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणं सोडणार नाही, असा ठाम पवित्रा पत्नीनं घेतला आहे. झारखंडची राजधानी रांचीत घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
राजेश कुमार नावाच्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध होते. तो एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यानं त्याच्या प्रेयसीसोबत विवाह केला. या लग्नाला पहिल्या पत्नीनं विरोध केल्यानं प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. यानंतर तिघांनी एक विचित्र करार केला. पती आठवड्यातले पहिले तीन दिवस पहिल्या पत्नीकडे, तर नंतरचे तीन दिवस दुसऱ्या पत्नीकडे राहील आणि एक दिवस पतीला सुट्टी असेल, असा हा करार होता. विशेष म्हणजे हा करार लिखित स्वरुपात होता. त्यामुळे काही दिवस तिघांमधील भांडणं कमी झाली.
तिघांनी केलेला विचित्र करार जवळपास महिनाभर चालला. मात्र आता या करारामुळे वेगळाच वाद निर्माण झाला असून त्याविरोधात दुसऱ्या पत्नीनं पोलीस ठाणं गाठलं आहे. पहिल्या पत्नीकडे गेलेला पती राजेश दुसऱ्या पत्नीकडे दुर्लक्ष करत आहे. तो तिच्याकडे जायलादेखील तयार नाही. यामुळे दुसरी पत्नी चिंतेत आहे. पतीनं आपल्यालादेखील वेळ द्यावा या मागणीसाठी तिनं थेट पोलीस ठाण्यात धरणं आंदोलन सुरू केलं आहे. या विचित्र प्रकरणावर भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.