मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 02:33 PM2020-09-13T14:33:06+5:302020-09-13T14:34:51+5:30

झाल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून पीडितेच्या ७ महिन्याच्या मुलीस मारण्याची धमकी आरोपीने दिली होती

Security guard rapes 20-year-old woman in quarantine centre in Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार  

मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार  

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अलगीकरण कक्षात एका २० वर्षीय विवाहितेवर पालिकेच्या ठेक्यावरील काम करणाऱ्या सैनिक सिक्युरिटीच्या सुरक्षा रक्षकाने सतत तीन दिवस बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे . या घटनेने खळबळ उडाली असून वाच्यता करू नये म्हणून पीडितेच्या ७ महिन्याच्या मुलीस मारण्याची धमकी आरोपीने दिली होती .

पीडिता हि मीरारोड परिसरात राहणारी असून तिला ७ महिन्याची मुलगी आहे . तिच्या घरातील आत्याची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पिडीतेसह घरातील सदस्यांना २४ मे रोजी महापालिकेच्या भाईंदर पूर्व येथील स्व . गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलासमोरील अलगीकरण कक्षात दाखल केले होते . सदर इमारतीत लहान सदनिका असल्याने प्रत्येकास स्वतंत्र सदनिकेत ठेवले जाते .

या ठिकाणी पालिकेचा ठेकेदार सैनिक सिक्युरिटीचा सुरक्षा रक्षक विक्रम बाबूसिंग शेरे ( २७ ) रा . गुजराती चाळ , मोती नगर , भाईंदर ( पश्चिम ) याने लहान मुलीला दुध व गरम पाणी देण्याच्या बहाण्याने पिडीतेशी ओळख केली . फिर्यादी नुसार विक्रम याने २, ३ व ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास पीडितेला ठेवलेल्या १०७ क्रमांकाच्या सदनिकेत जाऊन तिला धमकावून जबरदस्ती शारीरिक संबंध केले . कुठे वाच्यता केल्यास मुलीला ठार मारेन अशी धमकी आरोपीने दिली .

५ जून रोजी पीडितेला दुसरीकडे हलवण्यात आले . बरी होऊन ती घरी परतली . परंतु ऑगस्टमध्ये तिला गर्भ राहिल्याचे लक्षात आले . घरात तिच्या नवऱ्याला हा प्रकार समजल्या नंतर त्याने तिला सोडचिठ्ठी दिली . पीडितेने भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर शनिवारी रात्री विक्रम विरुद्ध बलात्कार सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे . आरोपी विक्रम देखील विवाहित असून त्याला दोन मुली आहेत असे सूत्रांनी सांगितले .

पोलिस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक निरीक्षक साहेबराव पोटे हे पुढील तपास करत आहेत . या घटनेचा आमदार गीता जैन यांनी निषेध केला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे . महापालिका अलगीकरण कक्ष आणि कोविड सेंटर मध्ये जे ठेक्यावरील कर्मचारी नेमत आहे त्यांचे चारित्र्य पडताळणी दाखले सक्तीचे करावेत . सीसीटीव्ही मार्फत सतत नियंत्रण ठेवावे . कर्मचाऱ्यांना अशी गैरकृत्ये करण्याचा विचार येतोच कसा ? त्यांना जरब बसेल अशी कठोर पावले पालिकेने उचलावीत . ठेकेदारावर कारवाई करावी असे आ. गीता जैन म्हणाल्या .

आमदार प्रताप सरनाईक म्हणाले कि , शहरातील बलात्काराच्या वाढत्या तक्रारी चिंताजनक असून, यात पालिका किंवा राजकीय पक्षाशी संबंधित आरोपी असणे हे अतिशय गंभीर आहे . या प्रकरणी आपण पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन देणार आहे . सैनिक सिक्युरिटीच्या तक्रारी सतत वाढत असून ठेकेदाराचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाका .

Web Title: Security guard rapes 20-year-old woman in quarantine centre in Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.