बघ्यांची गर्दी अन् काडीमोडीच्या गुंडांची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 09:39 PM2020-03-03T21:39:16+5:302020-03-03T21:48:53+5:30
पेट्रोलपंप लुटण्याचा होता डाव : सीसीटीव्हीत झाले कैद
नरेश डोंगरे
नागपूर : किरकोळ अंगयष्टी असलेल्या दोन गुंडांनी वाडीच्या एका पेट्रोलपंपावर रविवारी रात्री प्रचंड दहशत निर्माण केली. त्यांचा पेट्रोलपंप लुटण्याचाच मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणच्या या पेट्रोलपंपावर सुमारे १० मिनिटे हैदोस घातला. विशेष म्हणजे, यावेळी पेट्रोलपंपावर पाच ते सात कर्मचारी अन् आठ ते दहा वाहनधारकही होते. मात्र, या सर्वांनीच बघ्याची भूमिका वठविणे पसंत केले. त्यामुळे काडीमोडीच्या या गुंडांची भाईगिरी खपून गेली. लोकमतच्या हाती लागलेल्या या गुन्ह्याच्या व्हिडिओतून हा प्रकार पुढे आला.
नीलेश सिडाम आणि राकेश तिवारी अशी नावे असलेले हे भामटे आठवा मैल वाडी परिसरात राहतात. ते आणि त्यांचा एक साथीदार रविवारी रात्री १० च्या सुमारास वाडीतील मुख्य मार्गावर असलेल्या पेट्रोलपंपावर आले. एक जण बाजूलाच थांबला तर दोघांपैकी एकाने भलामोठा चाकू काढला. तो पाहून पेट्रोलपंपावरील कर्मचारी इकडे-तिकडे पळाले. दुसऱ्याने पंपाच्या मशीनचा पाईप हातात घेऊन स्वत:च स्वत:च्या दुचाकीत पेट्रोल घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला लॉक काढणे जमले नसावे. त्यामुळे ते राहून गेले. दुसरा भामटा चाकू घेऊन पैशाची बॅग सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याकडे गेला. प्रसंगावधान राखत तो कर्मचारी दूर निघून गेल्याने तेसुद्धा टळले. एक जण कॅबिनमध्ये आला.
विशेष म्हणजे, हडकुळे दिसणारे गुंड हातात चाकू घेऊन पेट्रोल पंपावर डाव साधण्याच्या तयारीत असताना तेथे अनेक दुचाकीचालक उभे होते. मात्र, गुंडांवर झपटण्याची हिंमत कुणीही दाखवली नाही. पाच ते सातच्या संख्येत असलेल्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या हातातील भलामोठा चाकू पाहून काडीमोडीच्या या गुंडांवर लाथ घालण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे ते पंपावर दहशत निर्माण करत राहिले. बराच वेळ झाल्यानंतर आपला डाव येथे साधला जाऊ शकत नाही, हे त्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे की काय, ते गुंड तेथून निघून गेले. हा संपूर्ण घटनाक्रम पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो बघता गुंडगिरी वाढल्याची ओरड करणारी मंडळी प्रसंगी कशी गप्पगुमान बसतात त्याचा प्रत्यय येतो. शिवाय बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच गुंड निर्ढावलेपणा दाखवतात, तेसुद्धा अधोरेखित होते.
अटक अन् जेलपास !
पेट्रोलपंपावरून निघाल्यानंतर या गुंडांनी एमआयडीसी परिसरात लुटमारीचे दोन गुन्हे केले. दरम्यान, गुन्ह्याची माहिती कळाल्यानंतर पाठलाग करून पोलिसांनी तीनपैकी नीलेश सिडाम आणि राकेश तिवारी या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांची पोलीस कस्टडी (पीसीआर) मिळवून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळवता आली असती. मात्र, प्रभावी बाजू मांडण्यात पोलीस कमकुवत ठरले. त्यामुळे न्यायालयाने पीसीआर ऐवजी त्यांना एमसीआर (न्यायालयीन कस्टडी) देऊन कारागृहात पाठविले.