बियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या; पोलिसांच्या श्वानाने काढला मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 01:57 PM2020-12-02T13:57:25+5:302020-12-02T14:05:49+5:30
यवतमाळात कुजलेला मृतदेह आढळला
यवतमाळ: बियाणे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी यवतमाळात उघडकीस आली. सुनील घनबहादूर रा. वरुड जऊळका ता. आकोट जि. अकोला असे मृताचे नाव आहे. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ही आत्महत्येची घटना रहस्यमयरीत्या उघडकीस आली.
यवतमाळातील पळसवाडी कॅम्प स्थित जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकाला पाचारण केले असता या श्वानाने दारव्हा रोडवरील विशाल लॉजच्या मागील बाजूपर्यंत माग काढला. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. सुनील घनबहादूर याने लॉजच्या मागील बाजूला झाडाला कापडाने गळफास लावून आत्महत्या केली. परंतु त्याच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले.
मृतेदह कुजलेला होता, गळफास घेतलेल्या अवस्थेत अंगातील कपडेच होते, शरीराचा बहुतांश भाग कुजून खाली पडला होता. यावरून ही आत्महत्या अनेक दिवस आधी झाली असावी असा अंदाज पोलीस वर्तवित आहे. सुनीलची पत्नी अकोला जिल्हा पोलीस दलात लिपिक पदावर कार्यरत आहे. सुनील बियाणे कंपनीत असून तो नेहमीच विशाल लॉजमध्ये राहायचा. त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्याची बॅग, वाहन लॉजमध्येच होते. मात्र त्याचा पत्ता नव्हता म्हणून लॉज मालकाने सुनीलच्या पुतण्याला याची माहिती दिली. त्यावरून पुतण्याने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून ६ नोव्हेंबरपासून सुनील बेपत्ता असल्याचे फिर्याद नोंदविली. त्याचा शोध सुरू असतानाच बुधवारी अखेर त्याच्या आत्महत्येचा उलगडा झाला.
आत्महत्येच्या ठिकाणापासून श्वानांनी ही कवटी बऱ्याच दूर तोंडात धरुन आणली असावी, असा अंदाज आहे. या कवटीमुळेच सुनीलच्या आत्महत्येला वाचा फुटली. आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पाेलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धारणे, यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर ठाणेदार धनंजय सायरे व पथकाने घटनास्थळी भेट दिली.