पतीला गळफास घेतलेले पाहता पत्नीनेही स्वत:ला संपवलं; कुटुंब पूर्णपणे हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:43 AM2023-03-05T09:43:19+5:302023-03-05T09:43:32+5:30
कुटुंबातील काही सदस्य तातडीने डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले असता त्याकाळात पत्नी मिथलेशने त्याच खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेत स्वत:चा जीव दिला
प्रयागराज - प्रतापगड परिसरातील एका गावात शुक्रवारी रात्री खोलीत पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहून पत्नीनेही आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. तर पत्नीच्या माहेरच्यांनी या घटनेत हत्येची शंका व्यक्त करत मृत व्यक्तीच्या वडील आणि भावावर संशय घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पूरब देऊम गावातील सोनू सरोज हे दिल्लीत कामाला होते. मागील सोमवारी ते दिल्लीहून घरी परतले होते. शुक्रवारी रात्री सोनूच्या मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सून घरी आली होती. गावातील महिला भावाच्या घरी लोकगीत गात होत्या. रात्री उशीरा कार्यक्रमाहून परतल्यानंतर सोनू सरोजने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने पत्नी मिथलेश ही त्याठिकाणी पोहचली. आरडाओरड झाल्यानंतर सोनूची आई प्रेमादेवी, वडील लक्ष्मण, मोठा भाऊ आणि भाचा पळत घटनास्थळी पोहचले. सोनूचा मृतदेह खाली उतरवला.
कुटुंबातील काही सदस्य तातडीने डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले असता त्याकाळात पत्नी मिथलेशने त्याच खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेत स्वत:चा जीव दिला. हे पाहून कुटुंबाला धक्काच बसला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी चौकशी करत दोन्ही मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले. शनिवारी सकाळी मिथलेशच्या माहेरचे लोक सासरी पोहचले. याबाबत मिथलेशचे वडील संग्रामपूर येथील रहिवासी सुखराम सरोज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीत म्हटलंय की, जमीन वादावरून सोनू आणि त्याची पत्नी मिथलेश यांचे मोठा भाऊ आणि भाच्यासोबत वाद झाले होते. या लोकांनी मारहाण करून त्यांना फासावर लटकवले आहे असा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीचे वडील, मोठा भाऊ आणि भाच्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांनुसार, पती-पत्नीच्या मृत्यूचं कारण फाशी घेतल्याचं आहे. परंतु पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.
मुलांच्या संगोपनाबाबत वाद
मृत सोनूच्या मृत्यूनंतर त्यांचे सासरे सुखराम हे मोठी मुलगी दिव्यांशी, प्रीती, लहिन्ना आणि मुलगा जिगर यांना सोबत ठेवण्यास तयार आहेत. मृत आई वडिलांच्या एक वर्षाच्या निष्पाप मुलाला कदाचित आपले आई वडील आता या जगात नाहीत हे माहित नसेल. इकडे मृत सोनूची आई प्रेमी देवी यांनीही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पोलीसही चिंतेत आहेत.