कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 08:44 PM2019-10-29T20:44:04+5:302019-10-29T20:45:07+5:30
आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
म्हापसा - कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे छापा मारून नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ आलेक्स याला अटक करून सुमारे ३ कोटीचे अमली पदार्थ जप्त केले. यात कोकेन, एमडीएमए, अँफेटॅमिन, चरस, गांजा व २ लाख रुपये रोख सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
कळंगुट पोलिसांच्या माहितीनुसार, दि. २९ रोजी सीमेर-कांदोळी येथे संशयित राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत छापा मारला. यावेळी पोलिसांनी नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ आलेक्स (३४) याला अटक करून त्याच्याकडून १.०२१ किलो कोकेन, २.०३५ किलो एमडीएमए, ७६० ग्रॅम अँफेटॅमिन, १०६ ग्रॅम चरस, १.२७० किलो गांजा व रोख २ लाख सापडले. हस्तगत केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ३ कोटी आहे. संशयित आलेक्स सध्या हा पोलीस कोठडीत आहे.
यापूर्वी २०११ साली संशयिताला राज्यात अवैद्यरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच २०१२ मध्ये कळंगुट पोलिसांनी कोकेनप्रकरणात अटक केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, महिला उपनिरीक्षक प्रगती मलीक, पोलीस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, शंशाक साखळकर, महाबळेश्वर सावंत, सुरेश नाईक, स्मीतल बांदेकर, संज्योत केरकर, गोविंद फटनिक, राजेश पार्सेकर, मनोज नाईक, महेंद्र च्यारी, बाबुसो साळगावकर, योगेश खोलकर, लक्ष्मण मांद्रेकर, दिनेश मोरजकर, शैलेश गडेकर यांनी यात भाग घेतला. एनडीपीसी २१ (सी), २२ (सी), २० (बी) (), २० (बी)(ए) याच्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक उत्किृष्ट प्रसून, पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस करीत आहेत.
दरम्यान, शनिवारी (दि.१९) मध्यरात्री कळंगुट व साळगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून 3 नायजेरियन नागरिकांना १.५४ लाखाच्या अमली पदार्थांच्या मुद्देमालसह अटक केली. सुमारे १२ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी संशयितांना साळगाव येथे अटक केली. यात दोघे पोलीस किरकोळ जखमी झाले. यामध्ये किनारी पट्ट्यातील कुख्यात ड्रग डिलर मायकल ओकाफोर याला अटक केली होती.