हिंजवडीत १२ लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:27 PM2018-11-27T19:27:44+5:302018-11-27T19:30:37+5:30
अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दोन टेम्पो पकडले.
पिंपरी : विक्री, तसेच साठा करण्यास बंदी असताना, अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोन टेम्पो मंगळवारी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आले. त्या टेम्पोतील ११ लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. दोन वाहने आणि गुटखा असा मिळुन २४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. या परिसरातील दोन महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.
गुटख्याच्या साठ्यासह आरोपी दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय ३०), पंकज दत्तात्रय तुरेकर (वय २७,मगरआळी,हडपसर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती हिंजवडीपोलिसांना मिळाली. नाकाबंदी करून पोलिसांनी दोन टेम्पो पकडले. त्या वाहनांची तपासणी केली असता, गुटख्याचा साठा आढळुन आला. १२ सप्टेंबरला हिंजवडी हद्दीत अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ४३ हजारांचा गुटखा जप्त केला होता.त्यानंतर १४ नोव्हेंबरला झालेल्या अशाच संयुक्त कारवाईत तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यात पोलिसांनी केलेली गुटखा जप्तीची ही तिसरी कारवाई आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी तसेच किरण पवार, कुणाल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.