साडेसात कोटींचे रक्तचंदन जप्त; त्रिकुट अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 08:39 PM2019-09-10T20:39:41+5:302019-09-10T20:43:55+5:30
गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
मुंबई - विक्रीसाठी बंदी असलेल्या दुर्मिळ रक्तचंदन लाकडाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लावण्यात मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथे दोन टॅम्पोतील तब्बल १५५६ किलो रक्तचंदन जप्त केले असून याप्रकरणी तिघाजणांना अटक केली.
असगर इस्माईल शेख (४९), अली शेख (३२)व वाजिद अन्सारी(३२) अशी त्यांची नावे असून जप्त केलेले रक्तचंदन सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये किंमत असून ते परदेशात पाठविण्यात येणार होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-९ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
आर्युवेदामध्ये अत्यंत महत्वपूर्ण समजले जाणाऱ्या रक्तचंदनाच्या लाकडाची तस्करी दोन टॅम्पोमधून करण्यात येणार असल्याची माहिती कक्ष-९चे निरीक्षक संजीव गावडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक आयुक्त भरत भोईटे व प्रभारी निरीक्षक महेश देसाई यांनी सापळा रचला. सोमवारी रात्री सातांक्रुझ पश्चिम येथे द्रुतगती महामार्गावरुन जात असलेल्या दोन टॅम्पो अडविले. त्याची झडती केली असता त्यामध्ये रक्त चंदनाच्या लाकडाची बुधे असल्याचे आढळून आले. टॅम्पोसोबत मिळून आलेल्या तिघाजणांना अटक केली. रक्त चंदनाची किंमत साडे सात कोटी रुपये असून ते गुजरातमार्गे वाहतूक करुन परदेशात पाठविण्यात येणार होती, या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण, ती कोठून आणण्यात आली, याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.