तरन्नूमच्या मार्गानेच गेली स्वदिच्छा? बँडस्टँडच्या किनाऱ्यावरील ‘तो’ प्रवाह घातक
By गौरी टेंबकर | Published: January 21, 2023 08:20 AM2023-01-21T08:20:28+5:302023-01-21T08:21:04+5:30
१३ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेच्या हत्येचे प्रकरण
गौरी टेंबकर-कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पालघरला राहणाऱ्या आणि १३ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याची कबुली जीवरक्षक मिथ्थू सिंहने दिली. या पार्श्वभूमीवर गोवंडीतील बेपत्ता विद्यार्थिनी तरन्नुम अन्सारी हिच्या मृत्यूप्रकरणाचा संदर्भ घेत पोलिसांनी स्वदिच्छाचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. तरन्नुम प्रकरणाशी स्वदिच्छा प्रकरणाचे कनेक्शन असल्याचा दावाही पोलिस सूत्रांनी केला आहे.
गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात राहणारी तरन्नुम २०१६मध्ये अंजुम खान आणि मस्तुरी खान यांच्यासोबत बँडस्टँडच्या किनाऱ्यापासून आत सेल्फी काढत होत्या. तेव्हा पाय घसरून तरन्नुम आणि अंजुम पाण्यात पडल्या. मस्तुरीने अंजुमला वर खेचले. तेथे पाण्याचा विचित्र प्रवाह असल्याने तरन्नुम वाहून गेली. आजतागायत तिचा मृतदेह सापडलेला नाही. मिथ्थू बँडस्टँड परिसरातच राहतो. पोहोण्यात तरबेज असल्याने त्याला समुद्रातील पाण्याच्या प्रवाहांच अंदाज आहे.
स्वदिच्छा बेपत्ता झाल्यानंतर पोलिस आपल्याला पकडणार, याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह तरन्नुम बेपत्ता झाली, त्याच भागात नेऊन टाकल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे जसा तरन्नुमचा मृतदेह सापडला नाही, तसाच स्वदिच्छाचाही सापडला नाही, तर पोलिसांना त्याच्यावरील आरोप सिद्ध करता येणार नाही, अशीही त्याची योजना असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
फाइल बंद केली तर न्यायालयात जाईन
स्वदिच्छाच्या हत्येचा ठोस पुरावा दिल्याशिवाय मी पोलिसांवर विश्वास ठेवणार नाही, मिथ्थू सिंहने कबुली दिली असली, तरी त्यानिमित्ताने या प्रकरणाची फाइल बंद करण्याचा प्रयत्न झाला तर मी न्यायालयात जाईन, मिथ्थूने स्वदिच्छाची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचे कबूल केले असले, तरी नॉर्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग केले तेव्हा मिथ्थू सिंहने गुन्ह्याची कबुली का दिली नाही? - मनीष साने, स्वदिच्छचे वडील
मृतदेह सापडेपर्यंत हत्येचा दावा खोटाच
मिथ्थूची नार्को व पॉलिग्राफिक टेस्ट गुन्हे शाखेने केली होती. पॉलिग्राफिकमध्ये कांट बी कन्क्लुडेड, तर नार्कोमध्ये नॉट गिल्टी असा अहवाल आल्याचे आम्हाला दाखविण्यात आले होते. या चाचणीदरम्यान सिंहने माझ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले का, हेही विचारले गेले. त्यावरही त्याने नाही असे उत्तर दिले होते. त्याने माझ्या बहिणीची हत्या केली असेल, तर नेमके कारण काय आहे? - संस्कार साने, स्वदिच्छाचा भाऊ
मिथ्थू निर्दोष; कुटुंबाचा दावा
स्वदिच्छावर मिथ्थूने बलात्कार करून तिची हत्या केली असती, तर तो पळून का गेला नाही. तो इथेच नोकरी व्यवसाय का करत आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी त्याला विनाकारण गोवल्याचा आरोप केला आहे. मिथ्थू समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतागृहाचा व्यवसाय सुरू करणार होता. गेल्या आठवड्यात त्याचे उद्घाटन होणार होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्याला अटक केली. त्यामुळे त्याने गुन्हा केला असता तर व्यवसायात गुंतवणूक का केली असती? असा प्रश्नही कुटुंबीयांनी विचारला. वर्षभरापूर्वी त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्रास दिला. चौकशी केली. जबाब घेतला. मात्र अखेर क्लीन चिट दिली. त्यानंतर तो फारच तणावात होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.
व्यवसाय ठप्प
मिथ्थूला मालाडच्या एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली. प्रशिक्षणही सुरू झाले. दरम्यान, त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कंपनीला समजल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले. बँडस्टँडवर येणारे ज्येष्ठ नागरिक तसेच फिरायला येणाऱ्यांच्या सोयीसाठी त्याने पे अँड यूज तत्त्वावरील स्वच्छतागृह बांधले. त्याचे उद्घाटन १७ जानेवारीला करण्यात येणार होते.