भीक मागण्यासाठी मुलांची विक्री; देऊळगाव मही येथील संशयीत महिला अैारंगाबाद पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 06:07 PM2021-09-04T18:07:45+5:302021-09-04T18:10:42+5:30
Crime News : देऊळगाव मही येथून एका संशयीत महिलेस ४ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
देऊळगाव राजा: अैारंगाबाद येथील सिग्नलवर भीक मागण्यासाठी दोन लहान मुलांना दोन महिला अमानुष मारहाण करत असल्याचे कथन करणारा चिमुकल्या मुलाचा व्हीडीअेा समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर अैारंगाबाद पोलिस सक्रीय झाले असून त्यांनी देऊळगाव मही येथून एका संशयीत महिलेस ४ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे.
देऊळगाव मही येथील दिग्रस रोडवरील एका महिलेस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अखिल काजी व राजू मोरे यांनी ताब्यात घेत चौकशीसाठी अैारंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुड वाढले आहे. भीक मागण्यासाठी एक वृद्ध महिला व अन्य एक महिला अमानुष मारहाण करून छळ करत असल्याचे कथन करणारा एक व्हीडीअेा सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. या कथित व्हीडीअेामधील चिमकुला मुलगा देऊळगाव मही, अकोला आणि राजस्थानचे नाव घेत आहे. दरम्यान या सुमारे ५ ते ६ वर्षाच्या मुलासह दोन वर्षाच्या मुलाला मारहाण होत असल्याची घटना अैारंगाबादमधील एका महिलेच्या निदर्शनास आली. तिने तिचे नातेवाईक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यास याबाबत माहिती दिली. प्रकरणी या सामाजिक कार्यकर्त्याने आवाज उठविल्यानंतर अैारंगाबाद येथील जनाबाई उत्तम जाधव (५९) आणि सविता संतोष पगारे (३५, दोघी रा. मुकुंदवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा नोंदवला आहे. या दोन्ही चिमुकल्या मुलांना त्या दोन महिलांनी विकत घेतले असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. ही दोन्ही मुले अकोला व जालना जिल्हातील असून काही दिवस देऊळगाव मही येथील एका कुटुंबाकडे ते राहले असल्याचे समाजमाध्यमांवरील चित्रफितीतून समोर येत आहे. त्यानुषंगानेच देऊळगाव मही येथून एका संशयीत महिलेस ४ सप्टेंबर रोजी ताब्यात घेत अैारंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रानी दिली.
--असा आला प्रकार उघडकीस--
औरंगाबादमधील रामनगर स्थित एका घरात सहा व दोन वर्षांच्या दोन चिमुकल्यांना डांबून ठेवल्याचे व दोन महिला त्यांना अमानुषपणे मारहाण करीत असल्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात आले. तिने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमाने ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचविली. मुकुंदवाडी (औरंगाबाद) पोलिसांनी त्या महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. त्यांनी दोन्ही मुलांना दत्तक घेतल्याचे सांगितले. मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखविला असता औरंगाबाद महामार्गावरील सिग्नलवर भीक मागण्यासाठी या दोन्ही चिमुकल्यांना ५० हजार रुपयांत विकत घेऊन शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून घेतल्याचे मुकूंद वाडी पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. बालकाची आई देऊळगाव मही येथे, वडील राजस्थानात तर आजी-आजोबा अकोला येथे राहतात असे हा चिमुकला चित्रफितीमध्ये सांगत आहे. भीक मागण्यासाठी आम्हाला एक म्हातारी व एक महिला अमानुषपणे मारहाण करते व भिक मागितली नाही तर मारून टाकण्याची व कोरोनात मुले मेल्याचे तुमच्या आईवडिलांना सांगू, अशी भीती दाखवतात, असल्याचेही या बालकाचे म्हणणे आहे.