'ड्राय डे'ला दारू विक्री, एकाला सापळा लावून केली अटक
By प्रशांत माने | Published: May 2, 2024 04:34 PM2024-05-02T16:34:23+5:302024-05-02T16:34:38+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : १० हजारांचा मुद्देमाल जप्त
कल्याण : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी ड्राय डे असल्याने कुठेही दारूविक्री केली जात नाही, असे असतानाही पुर्वेकडील विजयनगर नाक्याजवळ नामांकित कंपनीच्या सिलबंद दारूच्या बाटल्या विक्री करण्यासाठी आलेल्या कैलास कुऱ्हाडे ( वय ४५) याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुऱ्हाडे कडून दारूच्या बाटल्या आणि रोकड असा १० हजार ३०५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१ मे ला महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी दारू विक्रीवर बंदी आहे. कल्याण डोंबिवली भागात कोणत्याही प्रकारची दारू विक्री होत असल्यास कारवाईचे आदेश कल्याण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांनी युनिट ३ च्या पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचा-यांना दिले होते. दरम्यान कल्याण पुर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर येथे एकजण दारूच्या बाटल्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिटचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना खब-यामार्फत मिळाली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस हवालदार भोसले यांच्यासह विश्वास माने, गुरूनाथ जरग, दिपक महाजन, गोरक्ष शेकडे यांनी खब-याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी सापळा लावला आणि सीलबंद दारूच्या बाटल्या विक्री करण्यासाठी आलेल्या कुऱ्हाडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करून त्याला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. कु-हाडे हा कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील राहणारा आहे.