आई आजारी असल्याने पैशाची गरज असल्याचे सांगून olx वरून चोरीच्या दुचाकींची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:40 PM2018-12-19T22:40:33+5:302018-12-19T22:42:02+5:30
पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक आधाराच्या मदतीने मनीष अमित नाईकला ताब्यात घेतले.
मुंबई - आईचे ऑपरेशन असल्याने स्वस्तात मोटार सायकल विकायची असल्याची जाहिरात ओएलएक्सवर देऊन चोरीच्या दुचाकी नकली कागदपत्र बनवून विकणाऱ्या एका दुचाकी चोराला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनीष अमित नाईक (वय 21) राहणार नवघर रोड , मुलुंड असे या अट्टल दुचाकी चोराचे नाव असून त्याच्याकडून आता पर्यंत चार दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात दुचाकी आणि मुख्यत: ऍक्टिव्हा स्कुटर चोरी झाल्याच्या 4 तक्रारी दाखल झाल्या होत्या.पोलीस या आरोपीचा शोध घेत असतानाच मुलुंडमधील एका नागरिकाने त्याला चोरीची ऍक्टिव्हा विकल्याची तक्रार दिली.गाडी चा क्रमांक आणि गाडीचा इंजिन क्रमांक आरटीओमध्ये जुळत नसल्याने त्याने ताबडतोब नवघर पोलिस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक आधाराच्या मदतीने मनीष अमित नाईक ला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, दुचाकी आणि मुख्यतः ऍक्टिव्हा स्कुटी हा चोर चोरत असे. नंतर या दुचाकी निर्मनुष्य विभागात उभ्या करून तिचे फोटो ओएलएक्सवर विकण्यास टाकत असे. अर्ध्या किंमतीत तो नकली कागदपत्र बनवून या दुचाकी विकत असे. माझी आई आजारी असून तिच्या शस्त्रक्रिया साठी पैशाची गरज असल्याचे तो त्यावर लिहीत असे. अशा प्रकारे त्याने चोरलेल्या चार ऍक्टिव्हा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असून मनीषला भा.दं. वि. कलम 389 अंतर्गत अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस हवालदार विजय महागावकर, पांडुरंग सावंत, पोलीस शिपाई विनायक आंबरे, भरत सूर्यवंशी, अजय पिलानी इत्यादी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या अट्टल चोराला पकडण्यास यश मिळविले आहे.