बीएआरसीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वांद्रेतून बेपत्ता; निर्मलनगर पोलिसांकडून शोध मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 09:46 AM2024-09-10T09:46:22+5:302024-09-10T09:46:52+5:30
गेल्या चार वर्षांपासून अल्झायमर आजाराने त्रस्त असलेले कोळवणकर हे वांद्रे पूर्व येथील आराधना न्यू एमआयजी कॉलनीत राहतात.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - भूकंपशास्त्र अभ्यासक आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भाभा अणू संशोधन केंद्राचे (बीएआरसी) ज्येष्ठ शास्त्रज्ञ विनायक कोळवणकर (७६) हे गुरुवारपासून वांद्रे येथील निवासस्थानाहून बेपत्ता झाले आहेत. निर्मलनगर पोलिसांनी याप्रकरणी शोध मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या चार वर्षांपासून अल्झायमर आजाराने त्रस्त असलेले कोळवणकर हे वांद्रे पूर्व येथील आराधना न्यू एमआयजी कॉलनीत राहतात. गुरुवारी रात्री ते फुले खरेदी करण्यासाठी बाहेर पडले; परंतु घरी परतलेच नाहीत. कोळवणकर यांनी ४० वर्षे बीएआरसीमध्ये काम केले. भूकंपशास्त्र, भूकंपाचा अभ्यास या विषयात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. त्यांच्या संशोधनाने देशांना भूकंप होण्याआधीच्या स्थानांचा अंदाज लावण्यास मदत केली, ज्यामध्ये सूर्य, चंद्र आणि विशिष्ट ठिकाणांचा समावेश आहे. त्यांच्या कार्याचा जगभरातील १२५ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुत्र अमित कोळवणकर हे लंडनमध्ये राहतात. माझे वडील गुरुवारी एकटेच निघून गेले आणि परत आलेच नाही. वांद्रे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दिसून आले. मात्र, नंतर वांद्रे पश्चिम परिसरातून पुन्हा बेपत्ता झाले.
अद्याप ६८ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले!
कोळवणकर यांच्या शोधासाठी निर्मलनगर पोलिसांनी आतापर्यंत ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तीन अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या शोधासाठी नियुक्त केली आहे. ज्यात ६ ते ७ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, तिथून ते वांद्रे स्टेशनला नंतर अंधेरी रेल्वे स्टेशन, सांताक्रुज रेल्वे स्टेशन करत पुन्हा वांद्रे स्टेशनवरून लकी हॉटेलजवळील पेट्रोल पंपजवळ दिसले. आमच्याकडे तक्रार दाखल झाली असून आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिमंडळ आठचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.