कर्करोगाला कंटाळून वृद्धेने घेतले जाळून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 08:48 PM2018-08-07T20:48:11+5:302018-08-07T20:48:15+5:30
टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला १०० टक्के भाजली होती
मुंबई - टिळक नगर येथील अमरदीप सोसायटीमध्ये आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास एका वयोवृद्ध महिलेने कर्करोगाला कंटाळून स्वतःला जाळून घेतले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला १०० टक्के भाजली होती असल्याचे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.
लीला बाळकृष्ण नायर (वय - ८३) या वृद्ध महिला गेल्या २५ वर्षांपासून स्तनाचा कर्करोगाने त्रस्त होती. नंतर गेली ४ ते ५ वर्षांपूर्वी तिला हाडांचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. कर्करोगाने त्रस्त झालेल्या लीला नेहमीच्या औषधोपचाराला कंटाळल्या होत्या. शेवटी आज टोकाचे पाऊल उचलत त्यांनी घरातील ढेकूण मारण्यासाठी ठेवलेले रॉकेल अंगावर ओतून घेत स्वतःला जाळून घेतले. दरम्यान, दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचा नातू घरी आला असता त्याने आजीला जळालेल्या अवस्थेत पाहून पोलिसांना कळविले. जाळून आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने घरातील वीजचे मुख्य स्विच बंद केले होते असल्याचे माहिती कांबळे यांनी दिली. नंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल केला. त्यावेळी डॉक्टरांनी ती १०० टक्के भाजली असल्याचे स्पष्ट केले.