मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 02:55 PM2020-07-31T14:55:00+5:302020-07-31T14:57:34+5:30
१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल १ लाख, ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर : महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून त्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केले. १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल १ लाख, ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्प व्यवस्थापकांनी या प्रकरणाची गुरुवारी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
मेट्रो रेल कार्पोरेशनचे नागपुरात सिव्हील लाईनमध्ये ' मेट्रो हाऊस' आहे. येथील कार्यालयात अत्याधुनिक उपकरणे आणि टेलिफोन यंत्रणा बसविण्यात आली आहे. ईपीडीएक्स इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात आरोपींनी देश-विदेशात भरमसाठ कॉल केले. त्यामुळे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला १ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत एक महिन्याचे फोनचे बिल ९ लाख, ८४ हजार, ५०० रुपये आले. अकाउंट भागात हे बिल जाताच एकच खळबळ उडाली. एका महिन्याचे इतके बिल कसे आले, यावर मंथन सुरू झाले. नंतर महा मेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अवघे मेट्रो रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ पातळीवर विचार विमर्श केल्यानंतर ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मनेजर (टेलिकॉम) आशिषकुमार त्रिभुवन संधी यांनी गुरुवारी सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचे कलम ४२० तसेच सहकलम ६५, ६६ (ड) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दहशतवादी कनेक्शन ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेट्रो रेल्वेची ऑनलाइन हॅक करून विदेशात अनेक कॉल केले त्यामुळे संबंधित गुन्हेगारांचा पाकिस्तान अथवा अशाच कोणत्या शत्रू राष्ट्र किंवा त्या राष्ट्रातील दहशतवादी संघटनासोबत कनेक्शन आहे का, असा धडकी भरविनारा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधाने संबंधित अधिकारी चौकशी करीत आहेत.
कुठे किती कॉल्स ?
संबंधित आरोपींनी पाकिस्तान, बांगलादेश किंवा कोणत्या देशात, किती कॉल केले, त्याची माहिती उघड होऊ शकली नाही. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी या संबंधाने बोलताना प्रकरण संवेदनशील असल्यामुळे कसून तपास सुरू असल्याचे सांगितले.